ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरू आहे. दरम्यान, दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक लष्करी अधिकारी जखमी झाले असून, त्यांच्यावर लष्कराच्या 92 बेस रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बारामुल्ला जिल्ह्याच्या पट्टण भागातील येड्डीपुरा येथे दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार, सुरक्षा दलाने आज सकाळी शोधमोहीम हाती घेतली. दरम्यान, दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. या कारवाईदरम्यान एक लष्करी अधिकारी गोळीबारात जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लष्कराने या भागात अतिरिक्त कुमक पाठवली आहे. सीआरपीएफ आणि 29 आरआर तुकडीने अतिरेक्यांना घेराव घातला असून, चकमक सुरू आहे.