ऑनलाईन टीम / मुंबई :
येत्या शैक्षणिक वर्षांपासून (२०२०-२१) राज्यमंडळाचा बारावीचा अभ्यासक्रम बदलत आहे. बदलत्या अभ्यासक्रमाची पुस्तके विद्यार्थ्यांना लॉकडाऊन काळातही उपलब्ध व्हावी, यासाठी बालभारतीने बारावीची नव्या अभ्यासक्रमाची पुस्तके ‘पीडीएफ’ स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी बदलत्या अभ्यासक्रमाची नवी पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात. यंदाही बालभारतीने मार्चअखेरीस बारावीची सर्व पुस्तके दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके बाजारात उपलब्ध होऊ शकणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पहिली ते अकरावीचा अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने गेल्यावर्षीपर्यंत बदलण्यात आल्याने ती सर्व पुस्तके संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. लॉकडाऊन न हटल्यास येत्या शैक्षणिक वर्षांचे वेळापत्रक कोलमडणार आहे.