जमीन घोटाळा प्रकरण
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात बहुचर्चित असलेले जमीन घोटाळा प्रकरण आता अधिकच तापू लागले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी एसआयटीच्या हाती लागताच आता सरकारी अधिकारीही एसआयटीच्या गळाला लागू लागले आहेत. आसगाव-बार्देश येथील दोन जमीन घोटाळा प्रकरणात एसआयटीने बार्देशचे मामलेदार राहुल देसाई यांच्या विरोधात गुन्हा नेंद केला आहे. या प्रकरणांचा एसआयटी सखोल तपास करीत असून राहुल देसाई यांना अटकही होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आणखीनही काही सरकारी अधिकारी गुंतलेले असून त्यांचे धाबे दणाणले आहेत.
गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सध्या राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणातील 91 तक्रारी आहेत. त्यातील काही तक्रारी नोंद करून तपासकामाला सुरुवात केली आहे. तसेच या प्रकरणात अनेक संशयितांना आजपर्यंत अटक केली आहे. सरकारी अधिकारी तसेच राजकीय नेते या प्रकरणात गुंतलेले असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. जमीन घोटाळा प्रकरणातील प्रमुख संशयित एसआयटीच्या हाती लागत नसल्याने काहीच स्पष्ट होत नव्हते. आता एसआयटीच्या हाती प्रमुख संशयित लागल्याने सरकारी अधिकारी जमीन प्रकरणात गुंतलेले आहेत, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे.
बचावासाठी धडपड सुरू
जमीन घोटाळा प्रकरणातील सर्वांत प्रमुख संशयित सांतईनेज येथील मोहम्मद सुहेल याला अटक केल्यानंतर पुराभिलेख व पुरातत्व खात्यातील धीरेश नाईक व शिवानंद मडकईकर यांचा पर्दाफाश झाला होता. एसआयटीने त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली होती. त्यानंतर मुख्य संशयित रॉयसन रॉड्रिग्स, सँड्रिक फर्नांडिस व राजकुमार मायथी यांना अटक केल्यानंतर आसगाव-बार्देश येथील जमीन घोटाळा प्रकरणात बार्देश मामलेदार राहुल देसाई यांचे हात असल्याचे उघड झाले असून एसआयटीने राहुल देसाई विरोधात गुन्हा नोंद केला आहे. तिन्ही प्रमुख संशयितांनी काही राजकारण्यांची नावेही उघड केली असून एसआयटी त्याबाबत तपास करीत आहे. ठोस पुरावे मिळाल्यानंतर त्या राजकारण्याविरोधात गुन्हा नोंद करून त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे. ही माहिती त्या राजकारण्यापर्यंत तसेच काही सरकारी अधिकाऱयांपर्यंत पोहचली असून स्वतःचा बचाव कसा करता येईल त्यासाठी धडपड सुरु झाली असल्याचे दिसून येत आहे.

आसगाव-बार्देश येथील सर्वे क्रमांक 44/2 व 47/1 या जमिनीची संशयितांनी बनावट कागदपत्रे केली. नंतर ती कागदपत्रे मामलेदार कार्यालयात सादर करून जमीन आपल्या नावे केली. यातील काही प्रमाणात जमीन विकून टाकली आहे. एसआयटीने याबाबत दोन तक्रारी नोंद केले असून दोन्ही तक्रारीत मामलेदार राहुल देसाई यांचा सहभाग असल्याचे आढळून आल्यावर त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राहुल देसाई यांच्यासह ब्रांका डिनिझ, रॉयसन रॉड्रिग्स, पालमिरी डिनीझ, मारीयान आन्तानियो टीलेस यांचाही या प्रकरणात समावेश आहे.
गुन्हा अन्वेषण विभागाच्या एसआयटीकडे 91 तक्रारी असल्या तरी त्यातील काही तक्रारी नोंद करून त्यांचा तपास सुरु केला आहे. आतापर्यंत अनेक संशयितांविरोधात गुन्हा नेंद केला आहे. 15 संशयितांना अटक केली आहे. त्यातील काही जणांची सशर्थ जामीनावर सुटका झाली आहे. संशयितांची एका तक्रारीत जामीनावर सुटका झाली असली तरी त्याचा दुसऱया तक्रारीत सहभाग असल्याचे आढळून आल्यास त्याला पुन्हा अटक होऊ शकते. एसआयटी पोलीस याबाबत पुढील तपास करीत आहे.
देसाई यांचा निवडणुकीतही घोळ
काही दिवसांपूर्वी पंचायत निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी कळंगूट पंचायतीमधील प्रभाग 9 मध्ये जो उमेदवार व त्यांच्या चिन्हांचा घोळ घातला होता, त्या प्रकरणी तत्कालीन निर्वाचन अधिकारी राहुल देसाई हेही जबाबदार होते. त्यामुळे देसाई यांच्या कार्यपद्धतीबाबत शंका निर्माण केली जात आहे.