बार्शी/प्रतिनिधी
बार्शी शहरांमध्ये गेली सात दिवसात दोन कोरोनाचे रुग्ण वाढल्याने आता बार्शी मधील गर्दी कमी करण्यासाठीचे उपाय म्हणून आराखडा तयार करण्यासंदर्भात बार्शी नगर परिषदेच्या कर्मवीर जगदाळे मामा सभागृहांमध्ये सर्व प्रशासन यंत्रणेचे प्रमुख यांची आज बैठक पार पडली. ही बैठक बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीमध्ये सर्व प्रशासनाने मिळून बार्शीतील गर्दी कमी करणे आणि कोरोना बाबत सुरक्षेचे उपाय आखणे आणि त्याची अंमलबजावणी करणे या विषयात चर्चा होऊन काही निर्णय घेण्यात आले. या बैठकीस बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी शिवाजी गवळी, बार्शी नगर परिषद आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय गोदापुरे, बार्शी नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
आज बार्शी नगरपरिषदेच्या सभागृहांमध्ये झालेल्या बैठकीमध्ये, बार्शी मध्ये दुसरा रुग्ण कोरोना बाधित आढळल्यामुळे आणि बाजारपेठेमध्ये होणारी रोज गर्दी आणि सुरक्षेचे कोणतेही उपाय न करता चालणाऱ्या बाजारपेठा यावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. या बैठकीत घेतलेल्या निर्णयामध्ये बार्शी शहरांमध्ये ज्या ज्या विभागामध्ये मोठ्या बाजारपेठा आहेत त्याठिकाणी पथके नेमली जाणार आहेत या पथकामध्ये बार्शी नगर परिषद आरोग्य विभागाचे कर्मचारी, बार्शी नगर परिषद शाळेचे शिक्षक बार्शी तील सर्व खासगी शाळांमधील काही शिक्षक यांचा समावेश केला आहे. ही पथके दिवसभर बार्शी शहरांमध्ये गल्लोगल्ली फिरतील सर्व बाजारपेठेमधील दुकानावर त्यांची नजर असेल आणि बाजारपेठेमधील सर्व व्यापाऱ्यांनी करावयाची उपाययोजना याबाबत प्रबोधन करणारी असतील. तर जे नागरिक मास्क वापरत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे , सामाजिक अंतराचे नियम जो दुकानदार वापरत नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे तसेच बार्शी शहर मध्ये येणाऱ्या विविध रस्त्यावरती काही पथके नेमली जाणार असून त्यांना थर्मल मीटर आणि ऑक्सी मीटर सारखी साधने देण्यात येणार असून शहरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची टेंपरेचर टेस्ट आणि ऑक्सी मीटर टेस्ट घेण्यात येणार असल्याचे या बैठकीत ठरले.
बैठकीमध्ये भाजी मंडई चालू करण्या बाबत सांगोपांग विचार झाला तर अजून एक महिना तरी भाजी मंडई चालू करायची नाही असा निर्णय घेण्यात आला. यावेळी बार्शी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी त्यांना येणाऱ्या अडचणींविषयी कथन केले तेव्हा त्यांना आमदार राऊत यांनी सर्व पोलिसांना मदत देण्याचे कबूल केले , तर आता बार्शी मध्ये खाजगी शाळांमधील शिक्षक या पथकामध्ये नेमण्याचा आदेश तहसीलदार यांनी काढावा असेही राजेंद्र राऊत यांनी सांगितले. आजच्या झालेल्या बैठकीमध्ये राऊत यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की ही बाजारपेठेमध्ये किंवा इतर काम करणारी पथके जरी असली आणि ही पथके दंडात्मक कारवाई करणारी असली तरी नागरिकांनी याबाबत सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात आले.