ला लिगा फुटबॉल : मेस्सीचे चमकदार प्रदर्शन
मॅलोर्का, स्पेन
तीन महिन्यांच्या खंडानंतर स्पेनमधील ला लिगा फुटबॉल स्पर्धेने पुनरागमन केले असून या लीगमध्ये आघाडीवर असणाऱया बार्सिलोनाने रियल मॅलोर्कावर 4-0 असा दणदणीत विजय मिळविला. लायोनेल मेस्सीने एक गोल नोंदवला आणि दोन गोलसाठी सहकाऱयांना साहय़ केले.
बार्सिलोनाने जोरदार सुरुवात करताना दुसऱयाच मिनिटाला गोल नोंदवला. आर्टुरो विडालने हा गोल हेडरवर नोंदवला. या संघातून खेळणारा डेन्मार्कच्या मार्टिन बेथवेटने गोल करून पूर्वार्धातच ही आघाडी 2-0 अशी केली. बार्सिलोनासाठी नोंदवलेला त्याचा हा पहिलाच गोल होता. 79 व्या मिनिटाला जोर्डी अल्बाने संघाचा तिसरा गोल मेस्सीने पुरविलेल्या थ्रू पासवर नोंदवला. त्याआधी मेस्सीने ब्रेथवेटलाही गोलसाठी पास पुरविला होता. त्यानंतर स्टॉपेज टाईममध्ये मेस्सीने चेंडू डिफ्लेक्ट करीत गोल नोंदवत संघाचा मोठा विजय निश्चित केला.
या विजयानंतर बार्सिलोनाचे आता 28 सामन्यांतून 61 गुण झाले असून त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी रियल माद्रिदपेक्षा ते 5 गुणांनी पुढे आहेत. रियल माद्रिदची लढत आयबरशी होणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी या लीगमधील सामने प्रेक्षकांविना खेळविले जात आहेत. मात्र अर्जेन्टिनाचा शर्ट घातलेल्या एक चाहत्याने थेट मैदानातच प्रवेश केला. पण सुरक्षा रक्षकांनी त्याला तत्काळ ताब्यात घेऊन स्टेडियमबाहेर घालवून दिले. त्याच्याविरुद्ध खटला दाखल करण्याची मागणी बार्सिलोनाने केली आहे.
सहा महिन्यापूर्वी लुईस सुआरेझच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो प्रथमच या सामन्यात खेळला. उत्तरार्धात त्याला संधी देण्यात आली होती. मॅलोर्काने ला लिगातील पदावनतीचे शेवटचे स्थान मिळविले आहे. मात्र या सामन्यात त्यांच्या संघातून खेळणारा जपानचा 19 वर्षीय ताकेफुसा कुबोने चमकदार प्रदर्शन करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने बार्सिलोनाच्या गोलपोस्टपर्यंत दोनदा धडक मारली होती. याशिवाय अँटे बुदिमिर, लागो ज्युनियर, ऍब्डन प्राट्स यांनीही गोलच्या दिशेने फटके मारले होते.