बालचमूंनी मंगळवार पेठ, जुना बुधवार पेठ, रविवार पेठ आदींसह शहर, उपनगर परिसरात साकारलेत `बाल व काल्पनिक’ किल्ले
नंदकुमार तेली / कोल्हापूर
वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीचे औचित्य साधून बालचमू गड-किल्ल्यांच्या विश्वात रमले आहेत. लहान मुलांनी मावळे, तोफा, सैनिक, प्राणि आणि तयार किल्ले आदी साहित्याची जमवा-जमव केली आहे. तर काही ठिकाणी मुलांनी दिवसभर एकच ध्यास घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिंकलेल्या, गौरवशाली ऐतिहासीक पार्श्वभूमी असलेल्या किल्ल्यांच्या हुबेहुब प्रतिकृती साकारल्या आहेत. यामुळे शहरासह उपनगरातील गल्ली-बोळातील वातावरण शिवमय बनले आहे.
किल्ल्यांच्या साकारल्या हुबेहुब प्रतिकृती
गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून लहान मुलांनी गड-किल्ला साकारण्यासाठी परीश्रम घेत आहेत. यामध्ये मुलींचेही त्यांना सहकार्य असून किल्ला उभारणीसाठी लागणारे दगड, विटा, माती, पोते, पाणी, पताका आदींसह कुंभार गल्लीतून आवश्यक साहित्यांची त्यांनी जमवा-जमव केली आहे. दिवाळी काही दिवसांवर असल्याने फराळाचा अस्वाद घेत, आवडीच्या कामात बालचमू किल्ला अधिक चांगल्या प्रकारे होईल, याकडे लक्ष ठेवून आहेत.
जुना बुधवार पेठेत साकारतेय `भव्य काल्पनिक किल्ला’ प्रतिकृती
जुना बुधवार पेठेतील सम्राट ग्रुपतर्फे महादेव मंदिर परिसरात 10 फुट रुंद व 12 फुट लांब असा भव्य काल्पनिक किल्ला उभारण्याच्या कामात बालचमू व्यस्त आहेत. हा किल्ला उभारण्यासाठी गुपचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक भोसले, समर्थ पाटील, गणेश शिंदे, अथर्व कैफसरी, सोहम भोसले, पियुश शिंदे, अनमोल ठगरे, यश पाटील आदी बाल कार्यकर्ते परीश्रम घेत आहेत. तसेच सुनिल शिंदे व अशोक सुर्यवंशी यांनी न्यू पॅलेस येथे पन्हाळा गडाची प्रतिकृती साकारण्याचे काम सुरु केले असून येत्या तीन दिवसात पूर्ण होणार आहे.
रविवार पेठेत साकारलाय `बाल किल्ला’
‘रविवार पेठेतील लहान मुलांनी त्यांच्या कल्पेनेतील बाल किल्ला साकारला आहे. दारातील तुळशी कट्टयासमोर हा किल्ला साकारला आहे. या किल्ल्याच्या सभोवती बुरूज बांधण्यात आले असून मावळे तैनात करण्यात आले आहेत. तसेच तोफा ठेवण्यात आल्या असून जलकुंडही बांधण्यात आला आहे. किल्ल्याच्यावर बाल किल्ला, कोल्हापूर व किल्ला साकारणास सहकार्य करणाऱयांची व मावळयांची नावे असणारा फलक लावण्यात आला आहे. त्याचबरोबर शहरातील भगतसिंग तरुण मंडळ, डांगे गल्ली, मंगळवार पेठतील कोष्टी गल्ली, शाहू स्टेडियम येथील साठमारी, खासबाग आदी परिसरासह उपनगरातही बालचमूंनी लहान-मोठे किल्ले बांधलेले आहेत.