सांडपाणी-चिखलामधून ये-जा करावी लागत असल्याने नागरिकांतून संताप

प्रतिनिधी /बेळगाव
शहरात विविध विकासकामे राबवून स्मार्टसिटी बनविण्याचा आटापिटा सुरू आहे. याकरिता कोटय़वधीचा निधी खर्च केला जात आहे. मात्र काही भागात नागरी सुविधा उपलब्ध करण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे. विशेषतः बाळकृष्ण नगर तिसरा क्रॉस येथील गटार बांधकाम आणि रस्त्याच्या काँक्रीटीकरणाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सांडपाणी आणि चिखलामधून ये-जा करावी लागत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
स्मार्टसिटी बनविण्यासाठी प्रशासनाने एक हजार कोटीचा निधी खर्च केला. पण उपनगरातील समस्या जैसे थे आहेत. प्रमुख रस्त्यांचा आणि बाजारपेठेलगत असलेल्या परिसराचा विकास करून स्मार्टसिटी बनविण्याचा दावा केला जात आहे. मात्र वडगाव परिसरातील बाळकृष्ण नगरमधील समस्या पाहता स्मार्ट बेळगाव हेच आहे का? असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. बाळकृष्ण नगरमधील काही रस्त्यांवर अतिक्रमण झाल्याने रस्त्याचा वाद सुरू असताना रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. मात्र रस्त्याबाबत कोणताच वाद नसलेल्या तिसऱया क्रॉसवरील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाकडे प्रशासनाने कानाडोळा केला आहे. तसेच याठिकाणी गटारीचा पत्ता नसल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. परिणामी याठिकाणी सांडपाणी साचून रहात आहे. बाळकृष्ण नगरच्या मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले. मात्र अंतर्गत रस्त्याच्या काँक्रीटीकरणाकडे दुर्लक्ष झाले आहे. मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण करताना सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी सीडी आणि गटारीचे बांधकाम केले नाही. त्यामुळे सांडपाणी घरासमोर साचून रहात आहे.
किमान गटार बांधकाम करून सांडपाण्याचा निचरा होण्याच्यादृष्टीने कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. मनपा अधिकाऱयांनी पाहणी करून चार दिवसात काम सुरू करू, असे सागितले होते. पण चार महिने उलटले तरी अद्याप गटारीचे बांधकाम सुरू केले नाही. पावसाळय़ात याठिकाणी सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने खुपच समस्या निर्माण होतात. घरासमोर सांडपाणी साचत असल्याने घराबाहेर पडणे मुष्किल बनते. उन्हाळय़ातही सांडपाणी साचून रहात असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या परिसराच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.