बाळेकुंद्री / वार्ताहर
बेळगाव तालुका व परिसरात गेल्या कांही दिवसांपासून चोरटय़ांनी उच्छाद मांडला असून मंगळवारी दुपारी बाळेपुंद्री खुर्द येथे चोरटय़ांनी तीन लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केल्याने गावात खळबळ उडाली आहे. लक्ष्मीनगर येथील रहिवासी सुरेश लक्ष्मण हन्नीकेरी यांच्या घरी चोरी झाली असून दोघा हेल्मेटधारक चोरटय़ांनी तीन लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केला आहे.
सुरेश लक्ष्मण हन्नीकेरी हे मंगळवारी सकाळी घराला कुलूप लावून कोवाडजवळील किटवाड स्पॉट पाहण्यासाठी गेले होते. नेमक्या याच संधीचा फायदा घेऊन चोरटय़ांनी घराची कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर तिजोरीतील ठेवण्यात आलेले पाच तोळय़ांचे दागिने, आठ तोळे चांदी व रोख 35 हजार रुपये लंपास केले.
सुरेश किटवाडहून सायंकाळी आले असता दार उघडे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित मारिहाळ पोलीस ठाण्याला माहिती दिली. सीपीआय बाळाप्पा मंटूर व पोलिसांनी पंचनामा केला. मारिहाळ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.