अंतरा मेहताच्या रुपात भारताला दहावी तर महाराष्ट्राला पहिली महिला लढाऊ वैमानिक मिळाली आहे. अंतराने अगदी लहान वयापासूनच भारतीय सैन्य दलात जाण्याचं स्वप्न बघितलं होतं. बास्केटबॉल खेळणारी अंतरा आता आकाशात भरारी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. फ्लाईंग ऑफिसर म्हणून तिची निवड झाली आहे. अंतराच्या या यशाने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
एकेकाळी बास्केटबॉल कोर्टवर खेळणारी अंतरा मेहता आकाशात भरारी घेणार आहे. ती देशातली दहावी तर महाराष्ट्रातली पहिली महिला लढाऊ वैमानिक बनली आहे. वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी अंतराने हे यश मिळवलं आहे. नागपूरच्या अंतराने भारतीय सैन्यदलात जाण्याचा निर्णय लहानपणीच घेतला होता. बास्केटबॉलने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मत्त्वाची भूमिका बजावल्याचं अंतरा सांगते. अंतराला बहिणीने बास्केटबॉल खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं. वडील रवी मेहता अंतराला स्कूटरवरून बास्केटबॉल कोर्टवर सोडायला जायचे. घरातूनही अंतराला पूर्ण पाठिंबा मिळाला. त्यांनी कशातही आडकाठी केली नाही. अंतराला तिच्या मनाप्रमाणे खेळू दिलं. हवाई दलात कारकिर्द घडवू दिली. लहानपणापासूनच आहे त्या परिस्थितीत जगण्याची सवय लावली. भारतीय हवाई दलात प्रशिक्षण घेताना तिला हीच सवय कामी आली.
अंतरा घराजवळच्या ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानात बास्केटबॉल खेळायला जाऊ लागली. त्यानंतर तिने नवयुवक क्रीडा मंडळात जाण्याचा निर्णय घेतला. अंतराचा खेळ सुधारत होता. वर्षभरातच महाराष्ट्राच्या सोळा वर्षांखालील संघात तिची निवड झाली. 2012 मध्ये इंदूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत तिने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. यानंतरही तिने राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. 2015 मध्ये कुन्नूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघात ती होती. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत ती दोनदा सहभागी झाली. तिने अजूनही बास्केटबॉल सोडलेलं नाही. भारतीय हवाई दलात महिला बास्केटबॉलपटू नसल्यामुळे ती मुलांसोबत खेळते.
अंतरा 2018 मध्ये इंजिनिअर झाली. यानंतर तिने भारतीय संरक्षण दलांमधल्या संधी शोधायला सुरूवात केली. तिने त्याच वर्षी संरक्षण दलांच्या वाराणसी आणि म्हैसूर केंद्रांना भेटी दिल्या. ती सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाची परीक्षा तिसर्या प्रयत्नात उत्तीर्ण झाली. मग 18 महिन्यांनी तिची फ्लाईंग ऑफिसर म्हणून नेमणूक झाली. अंतराला हॉक्स हे लढाऊ विमान चालवण्याचं प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे.
जिद्दीच्या बळावर आपण काहीही करू शकतो, असं अंतरा सांगते. अंतराला भारतीय हवाई दलाने नेहमीच भुरळ घातली. नौदलात निवड झाली असती तर आपण हवाई दलासाठी प्रयत्न केले असते, असं अंतरा सांगते.