ऑनलाईन टीम / हैदराबाद :
बाहुबली चे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला आहे. राजामौली आणि त्यांच्या कुटुंबाला हलका ताप आला होता त्यांनतर त्यांनी कोरोना चाचणी केली असता त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. स्वतः राजामौली यांनी याबाबत ट्विट करत ही माहिती दिली आहे.

ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, मला आणि माझ्या कुटुंबीयांमध्ये मागील काही दिवसांपासून हलका ताप होता. हळूहळू तो कमी झाला परंतु आम्ही टेस्ट करुन घेतली. या टेस्ट चे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने होम क्वारंटाइन मध्ये आहोत. सध्या तरी आमच्यात कोणतेही लक्षणे नाही आहेत. सध्या आमची प्रकृती स्थिर आहे. परंतु आम्ही काळजी घेत असून डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करत आहोत.
पुढे ते म्हणाले, आम्ही आमच्या शरीरात ॲटीबॉडी विकसित होण्याची वाट पाहत आहोत. म्हणजे आम्हांला प्लाझ्मा डोनेट करता येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, सध्या राजामौली हे ‘आरआरआर’ या चित्रपटावर काम करत आहेत. यामध्ये एन टी रामा राव ज्युनियर मुख्य भूमिकेत असून आलिया भट, अजय देवगण आणि श्रेया शरण हे देखील यामध्ये भूमिका साकारताना दिसतील.