वार्ताहर/ संगमेश्वर
दोन बिबटय़ांच्या झटापटीत बिबटय़ा प्राण वाचवण्यासाठी झाडावर चढला आणि कोसळून त्याच्या पायाला दुखापत झाल्याने उपाशीपोटी त्याचा मृत्यू झाल्याची घटना पिरंदवणे तारवाशेत येथे घडली. वनविभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, पिरंदवणे येथील तारवाशेत येथे मंगळवारी सकाळच्यादरम्यान गुराखी गुरे घेवून चरण्यासाठी गेला असता बिबटय़ा मृतावस्थेत असल्याची खबर पोलीस पाटील अनिल भांबटे यांना दिली. त्यांनी ही खबर तत्काळ वनविभागाला दिली असता वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका लगड, वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक नानू गावडे, पोलीस पाटील आणि पोलीस कांबळे व लांडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तारवाशेत येथे बिबटय़ा हा कुजलेल्या स्थितीत आढळला. हा बिबटय़ा अडीच वर्षाचा असून नर जातीचा होता. त्याची लांबी 205 सेमी आणि 67 उंची होती. बिबटय़ाचा दोन दिवसापूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाच्यावतीने काढण्यात आला आहे.
पिरंदवणे येथील तारवाशेत येथे दोन बिबटय़ांची झटापट झाली. त्यापैकी एका बिबटय़ाने आपला जीव वाचवण्यासाठी रस्त्याच्या बाजूला असलेल्या आकेशिया वृक्षावर चढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या झाडावर ओरखडेही दिसत आहेत. बिबटय़ा झाडावर चढल्यानंतर त्याचा तोल जावून तो खाली कोसळला व यात त्याच्या पायाला गंभीर इजा झाली. त्याला भक्ष्य मिळणे कठीच झाल्याने त्याचा भुकबळी गेल्याचे बिबटय़ाचे शवविच्छेदन करणारे डॉक्टर जंगमी यांनी सांगितले. वनविभागानेही या गोष्टीला दुजोरा दिला आहे. बिबटय़ाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
संगमेश्वर तालुक्यात सलग दुसरी घटना
संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते तेलीवाडी येथे सोमवारी बिबटय़ाचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. तर सलग दुसऱया दिवशी पिरंदवणे येथे बिबटय़ा कुजलेल्या स्थितीत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.