ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता 7 जुलैपासून अनलॉक – 4 ची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत अनलॉक 4 चा निर्णय घेण्यात आला. यावेळी काही नवीन मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत.

यानुसार, बिहारमध्ये आता पूर्ण क्षमतेने सरकारी आणि बिगर सरकारी कार्यालयात काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या कार्यालयांमध्ये केवळ लसीकरण केलेल्याच नागरिकांना परवानगी असणार आहेत.

यासोबतच बिहारमध्ये 11 वी आणि 12 वी पर्यंतच्या शाळा आणि कॉलेज 50 टक्के क्षमतेनुसार उघडले जाणार आहेत. तसेच राज्यातील विद्यापीठे, सर्व कॉलेज, टेक्निकल इन्स्टिट्युट, सरकारी प्रशिक्षण संस्था 50 टक्के उपस्थितीसह उघडण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले की, एकूण क्षमतेच्या 50 टक्केच लोकांना रेस्टॉरंट आणि खाण्याच्या दुकानांमध्ये प्रवेश असणार आहे.
दरम्यान, राज्यातील अनलॉक 3 हा 6 जुलै रोजी संपणार आहे. त्यापूर्वी आयोजित बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले असून बाबींमध्ये सूट देण्यात आली आहे.