चेहर्याची देखभाल करताना रसायनयुक्त सौंदर्यप्रसाधनांचा वापर होतो. यामुळे तात्पुरता उजळपणा मिळत असला तरी त्याचे दुष्परिणामही होतात. म्हणूनच नैसर्गिक घटकांनी त्वचेचं सौंदर्य खुलवायला हवं. चेहर्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी तुम्ही घरी सीरम तयार करू शकता. बीट आणि कोरफडीचा गर वापरून हे सीरम बनवता येईल. यासोबतच बीटचे इतरही उपयोग आहेत.
यासाठी बीटची सालं काढून छोटे तुकडे करून घ्या. हे तुकडे मिक्सरमध्ये वाटून घ्या. गरज पडल्यास थोडं पाणी घालता येईल. सीरम बनवताना बीटचा रस वापरायचा आहे. त्यामुळे बीटचा गर गाळून घ्या. तुम्ही कोरफडीचा गर बाजारातून आणू शकता किंवा घरी कोरफड असेल तर ताजा गर वापरू शकता. दोन चमचे कोरफडीच्या गरात एक चमचा बीटचा रस घाला. नीट मिसळून घ्या. हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेऊन द्या. यात लवेंडर एसेन्शियल ऑईलचे काही थेंब घालता येतील. यामुळे चेहरा छान उजळ आणि तजेलदार दिसेल. शिवाय लवेंडर ऑईलच्या सुगंधामुळे ताजंतवानं वाटेल.
बीटाचे अनेक लाभ आहेत. तेलकट त्वचेच्या महिलांना मुरूमांचा त्रास असतो. बीटमधल्या घटकांमुळे मुरूमं कमी होऊ शकतात. मुरूमं घालवण्यासाठी एक चमचा दह्यात दोन चमचे बीटचा रस घाला. ही पेस्ट मुरूमांवर लावा. वाळू द्या. मग धुवून टाका. हा उपाय नियमितपणे केल्यास मुरूमं निघून जातील. तसंच डागही राहणार नाहीत. बीटच्या रसामुळे चेहर्यावरील मृत त्वचा निघून जाते आणि तुम्ही उजळ दिसू लागता. बीटचा रस प्यायल्यास शरीरातले विषारी घटक बाहेर पडतात. उजळपणासाठी क्रीम वापरायचं नसेल तर बीट आणि लिंबाच्या रसाचं मिश्रण तयार करून चेहर्याला लावा. या उपायामुळे चेहर्याचा काळपटपणा दूर होईल.