वेदान्ताने लावली 59 हजार कोटींची बोली : अन्य कंपन्याही बोलीच्या तयारीत
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल)मधील हिस्सेदारीची विक्री करण्यात येणार आहे. सदर विक्रीतून सरकार येत्या काळात 45 हजार कोटी रुपये उभारणार असल्याचे संकेत आहेत. सरकार याबदल्यात बीपीसीएलची 52.98 टक्के हिस्सेदारी विकणार असल्याची माहिती आहे. सदरच्या विक्रीसाठी तीन कंपन्यांनी बोलीसाठी पुढाकार घेतल्याची माहिती आहे. यामध्ये सध्या वेदान्ता कंपनीने 59 हजार कोटी रुपयांची बोली लावलेली आहे.
बीपीसीएलमधील वाटा घेण्याच्या स्पर्धेत सध्या खाण क्षेत्रातील दिग्गज कंपनी वेदान्ता समूहाने जवळपास 75 टक्के हिस्सेदारी विकत घेण्याची तयारी दर्शवली असून याच कंपनीला सर्वात मोठा बोलीचा दावेदार मानला जात आहे. यात वेदान्ताने तब्बल 59 हजार कोटी रुपयांची बोली लावलेली आहे.
वेदान्ता केयर्न इंडियाच्या मदतीने या अगोदरच ऑईल आणि गॅस व्यवसायात वेदान्ता कार्यरत आहे. यातील कंपनी 53 टक्के हिस्सेदारी ही सरकारकडून खरेदी करणार असल्याचे सांगण्यात येते.
बीपीसीएलचे भाव तेजीत
बीपीसीएलची हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी लगबग चालली असून कंपनीच्या समभागांमध्ये शेअर बाजारात तेजी दिसते आहे. सध्या बीपीसीएलच्या समभागाचे भाव 400 रुपयांच्या घरात पोहोचले आहेत.