वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
बीसीसीआयने आयपीएलचे प्रमुख पुरस्कर्ते विवो या चायनीज मोबाईल फोन कंपनीशी केलेला करार रद्द केला असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले. या वर्षीची आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये होणार असून चिनी कंपनीकडे प्रायोजकत्व कायम ठेवल्यानंतर सोशल मीडियामधून बीसीसीआयवर जोरदार टीकास्त्र सुरू झाले होते. चाहत्यांच्या भावनांसमोर अखेर बीसीसीआयला झुकावे लागल्याचे दिसून आले.
यावर्षी विवो आयपीएलशी निगडित असणार नाही, असे एका ओळीचे निवेदन देताना बीसीसीआयने कोणताही तपशील दिला नाही. ‘बीसीसीआय व विवो मोबाईल इंडिया प्रा. लि. दोघांनी मिळून आयपीएल 2020 मधील भागीदारी संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे या निवेदनात म्हटले आहे. विवोने 2018 ते 2022 या पाच वर्षाच्या कालावधीसाठी 2190 कोटी रुपयांना प्रायोजकत्वाचे हक्क मिळविले होते. यानुसार प्रतिवर्षी 440 कोटी रुपये बीसीसीआयला मिळणार होते. विवो आता बाजूला झाले असल्याने बीसीसीआयला लवकरच घटनेनुसार नव्या पुरस्कर्त्यांसाठी निविदा काढावी लागणार आहे. आयपीएल स्पर्धा 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. बीसीसीआय व विवो भविष्यात पुन्हा एकत्र येण्यासाठी योजना आखण्याची शक्यता आहे. नव्या शर्तीनुसार त्यांच्यात 2021 पासून करार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने ही शक्यता फेटाळून लावली.