फिनिक्स मास्टरलीग क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना मैदानावर फिनिक्स एव्हीएन्सी आयोजित फिनिक्स मास्टर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत बीसीसी मच्छे संघाने ऍड. पाटील लायन संघाचा 1 धावेने तर विश्रुत स्ट्रायकर संघाने के. आर. शेट्टी किंग्स संघावर 4 गडय़ाने मात करून दोन गुण मिळविले. प्रसाद नाकाडी (मच्छे), प्रमोद पालेकर (विश्रुत स्ट्रायकर) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर पहिल्या सामन्यात बीसीसी मच्छे संघाने प्रथम फलंदाजी करताना 19.4 षटकात सर्वबाद 105 धावा केल्या. विनित आडुरकर व आनंद करडी यांनी प्रत्येकी 23 धावा केल्या. ऍडव्होकेट लॉयन्सतर्फे सुनिल सक्रीने 19 धावात 3, मदन बेळगावकरने 19 धावात 2 तर विशाल गौरगोंडाने 18 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल ऍडव्होकेट पाटील लायन संघाचा डाव 19.2 षटकात सर्व गडी बाद 104 धावात आटोपला. सुनिल पाटील व मदन बेळगावकर यांनी प्रत्येकी 16, एन. बी. पाटीलने 15 तर सुनिल सक्रीने 12 धावा केल्या. बीसीसी मच्छेतर्फे प्रसाद नाकाडीने 27 धावात 4, तर मनोज पाटीलने 15 धावात 2 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात के. आर. शेट्टी संघाने 20 षटकात 9 बाद 119 धावा केल्या. प्रणय शेट्टीने 1 षटकार 1 चौकारासह 34, प्रशांत लायंदरने 4 चौकारासह 26, नंदकुमार मलतवाडकरने 16 तर भरत गाडेकरने नाबाद 14 धावा केल्या. विश्रुत स्ट्रायकरतर्फे प्रमोद पालेकरने 26 धावात 4, ताहीर सराफने 22 धावात 2, हनिफ व नरेंद्र मांगुरे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल विश्रुत स्ट्रायकर संघाने 19 षटकात 6 बाद 125 धावा करून सामना 4 गडय़ाने जिंकला. मिलिंद चव्हाणने 1 षटकार 4 चौकारासह 34, तर प्रमोद पालेकरने 1 षटकार 4 चौकारासह 33 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे भरत गाडेकरने शून्य धावात 2, अनंत माळवीने 20 धावात 2 गडी बाद केले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे ओंकार बेनके, अंकुश तापाली, जोतिबा गिलबीले यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार प्रसाद नाकाडी, इन्पॅक्ट खेळाडू व सर्वाधिक षटकार मदन बेळगावकर, उत्कृष्ट झेल प्रवीण कुराडे. दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे ज्येष्ट क्रिकेटपटू प्रमोद पवार, साजित पठाण, अनिल गवी यांच्या हस्ते सामनावीर प्रमोद पालेकर, इन्पॅक्ट खेळाडू व सर्वाधिक षटकार मिलिंद चव्हाण, उत्कृष्ट झेल प्रणय शेट्टी यांना चषक देऊन गौरविण्यात आले. सोमवारी स्पर्धेला सुटी आहे.