प्रतिनिधी/ सातारा
दुचाकी तसेच मोठय़ा गाडय़ांच्या बॅटऱया चोऱया करुन ती विकणारी चोरटय़ांची टोळी जेरबंद करण्यात शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाला यश आले असून या टोळीकडून 5 गुन्हे उघडकीस आले आहेत. याप्रकरणी दोन सराईत गुन्हेगार असलेले अल्पवयीन बालक व त्यांच्याकडून चोरीचा माल विकत घेणारा भंगार व्यवसायिक दिनेश सूर्यकांत जगताप (रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातारा शहर व परिसरात दुचाकी चोरी तसेच मोठय़ा गाडय़ांच्या बॅटऱया चोरीच्या घटना घडत होत्या. या गुन्हय़ांचा तपास करण्याच्या सूचना सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार तपास सुरु असताना गुन्हे प्रकटीकरण विभागाकडून पेट्रोलिंग करत असताना करंजे परिसरात दोन अल्पवयीन मुले संशयास्पदरित्या दुचाकीवरुन फिरताना आढळून आली. त्यांना थांबवले असता ते पळून निघाले. मग पथकातील कर्मचाऱयांनी त्यांना पाठलाग करुन ताब्यात घेतले.
अल्पवयीन बालकांकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल ही वडूथ या गावावरुन चोरली असून पोत्यामध्ये मिळालेली बॅटरी ही चकोर बेकरीसमोरुन चोरुन विक्रीसाठी नेत असल्याची कबुली दिली. दोन्ही अल्वयीन बालक हे अभिलेखावरील सराईत चोरटे असल्याने त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी केसरकर पेठेतून आणखीन एक मोटारसायकल तसेच शहरातील सोमवार पेठ, समर्थ मंदिर, शाहुनगर गोडोली, शनिवार पेठ इत्यादी भागातून रात्रीचेवेळी उभ्या असलेल्या मोठय़ा वाहनांच्या बॅटऱया चोरी केल्याची व सदरच्या बॅटऱया आकाशवाणीमधील भंगार व्यावसायिकास विकल्या असल्याची माहिती दिली.
पोलिसांनी भंगार व्यावसायिकास ताब्यात घेवून त्याच्याकडून त्याने चोरीच्या विकत घेतलेल्या 10 बॅटऱया हस्तगत केलेल्या आहेत. त्यांच्याकडून एकूण 1 लाख रुपये किंमतीच्या दोन मोटारसायकल व 11 बॅटऱया असा मुद्देमाल हस्तगत करत चोरीचे 5 गुन्हे उघडकीस आणले आहेत. या गुन्हय़ांचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल शंकर गायकवाड, सुनिल मोहरे करत आहेत. या कारवाईत सहाय्यक निरीक्षक संदीप शितोळे. हेड कॉन्स्टेबल हसन तडवी, पोलीस नाईक लैलेश अशोक फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार, पंकज मोहिते, नितीन शिंगटे यांनी सहभाग घेतला.