प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला असतानाच गुरुवारी सकाळी बेंगळूरमध्ये स्फोटकसदृश वस्तू आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या वस्तूची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये फटाके तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रासायनिक पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण ही वस्तू कोणी ठेवली?, यामागील उद्देश कोणता?, असे प्रश्न उपस्थित झाले आहे.
लॉकडाऊनमुळे हैराण झालेल्या बेंगळूरवासियांना गुरुवारी सकाळी स्फोटकसदृश वस्तू आढळून आल्याच्या वृत्ताने धक्का बसला. हनुमंतनगर पोलीस स्थानक हद्दीत ाrल कत्रीगुप्पे येथे रस्त्यावर नारळाच्या आकाराची संशयास्पद वस्तू आढळली. स्थानिकांनी याविषयी पोलिसांना माहिती दिल्यानंतर विधिविज्ञान प्रयोगशाळेच्या तज्ञांनी स्फोटकाची पाहणी केली. नंतर ही वस्तू बसने केंपेगौडा मैदानावर नेण्यात आली. या वस्तूमध्ये पोटॅशियम नायट्रेट हा रासायनिक पदार्थ आढळून आला. त्याचा वापर फटाक्यांमध्ये होतो. ही वस्तू निष्क्रिय करण्यात आली आहे, अशी माहिती बेंगळूर शहर पोलीस आयुक्त भास्करराव यांनी दिली.