बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी, बृह बेंगळूर महानगर पालिकेने (बीबीएमपी) या वर्षी नवीन वर्षाच्या उत्सवावर बंदी घालण्याची शिफारस सरकारकडे करण्यासाठी योजना आखत आहे.
बीबीएमपी कमिशनर एन मंजुनाथ प्रसाद यांनी आम्ही दसरा आणि गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला आहे आणि काही दिवसातच आपण दीपावली साजरी करू, असे ते म्हणाले. दरम्यान हे सर्व उत्सव सावधगिरी बाळगून आणि कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून साजरे केले गेले आहेत. नवीन वर्षाच्या उत्सवाच्या वेळी, आम्हाला एमजी रोड, ब्रिगेड रोड इत्यादी ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमलेले दिसतात. अशा गर्दीस परवानगी दिली गेली तर सामाजिक अंतर आणि मास्क घालणे यासारख्या मार्गदर्शक सूचना लागू करणे कठीण होईल, त्यामुळे नवीन वर्षाच्या उत्सवासंदर्भात विचारविनिमय सुरु असल्याचे ते म्हणाले.
दरवर्षी, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरातील सेंट्रल बिझिनेस डिस्ट्रिक्ट (सीबीडी) भागात एम जी रोड, चर्च स्ट्रीट, कमर्शियल स्ट्रीट आणि ब्रिगेड रोड यासारख्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक जमत असतात. कोरोना प्रसार टाळण्यासाठी महापालिका कठोर निर्णय घेणार असून याविषयी राज्य शासनाकडे शिफारस करणार आहे.