6 बाद 201 धावांचा डोंगर रचल्यानंतर सनरायजर्स हैदराबादचा 69 धावांनी दणकेबाज विजय
वृत्तसंस्था/ दुबई
जॉनी बेअरस्टो (55 चेंडूत 97) व डेव्हिड वॉर्नर (40 चेंडूत 52) या जोडीने 160 धावांची दणकेबाज सलामी दिल्यानंतर सनरायजर्स हैदराबादने आयपीएल साखळी सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध 69 धावांनी दमदार विजय संपादन केला. प्रारंभी, हैदराबादने 20 षटकात 6 बाद 201 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात पंजाबचा डाव 16.5 षटकात सर्वबाद 132 धावांवरच गुंडाळला गेला.
विजयासाठी 202 धावांचे खडतर आव्हान असताना पंजाबतर्फे केवळ निकोलस पूरननेच एकाकी झुंज दिली. त्याच्या 37 चेंडूतील 77 धावांच्या खेळीत 5 चौकार व 7 उत्तूंग षटकारांचा समावेश राहिला. पण, त्याचा अपवाद वगळता पंजाबच्या अन्य सर्व फलंदाजांनी सपशेल लोटांगण घातले. हैदराबादतर्फे फिरकीपटू रशीद खानने 4 षटकात 12 धावातच 3 बळी घेतले. अब्दुल समदच्या एकाच षटकात पंजाबने 28 धावांची लयलूट केली.
सलामीवीरांची फटकेबाजी
प्रारंभी, सनरायजर्सने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि हा निर्णय त्यांच्यासाठी सार्थही ठरला. जॉनी बेअरस्टो व डेव्हिड वॉर्नर या जोडीने प्रारंभापासूनच आक्रमक फटकेबाजी करत पंजाबच्या गोलंदाजांना चांगलेच जेरीस आणले. पंजाबचा कर्णधार केएल राहुलने डोकेदुखी ठरत असलेली ही जोडी फोडण्यासाठी गोलंदाजीत अनेक प्रयोग राबवले. पण, या उभय सलामीवीरांना त्याला अजिबात यश येऊ दिले नाही. अपवाद म्हणून बेअरस्टोला अवघ्या 19 धावांवर बाद करण्याची नामी संधी हैदराबादकडे चालून आली होती. पण, त्यावेळी मिडऑफवर केएल राहुलने झेल सोडला होता.
वॉर्नर-बेअरस्टो यांनी 6 षटकात बिनबाद 58 धावा फलकावर लावल्या व नंतर हाच धडाका पुढेही कायम राखला. मुजीब, अर्शदीपवर सातत्याने आक्रमण चढवले गेल्यानंतर केएल राहुलने मॅक्सवेलकडे चेंडू सोपवला. पण, त्यालाही 2 षटकात 26 धावा मोजाव्या लागल्या.
बेअरस्टोने अर्शदीपच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत अर्धशतक साजरे केले आणि याचवेळी हैदराबाद संघाचे शतकही फलकावर लागले. पुढे वॉर्नरने मुजीबच्या षटकात आयपीएल इतिहासातील आपले 46 वे अर्धशतक पूर्ण केले.
एकीकडे, बेअरस्टो आक्रमक पवित्र्यात असताना त्याला वॉर्नरने पूरक साथ देण्यावर भर दिला. मात्र, अगदी स्वतः वॉर्नरने देखील खराब चेंडूंचा समाचार घेण्यात अजिबात कसर सेडली नाही. त्याने गोलंदाजांवरुन साईटस्क्रीनच्या दिशेने अनेक चेंडू सीमापार पिटाळून लावले. अंतिमतः डावातील 16 व्या षटकात फिरकीपटू रवी बिश्नोईने गुगलीवर वॉर्नरला चुकीचा फटका खेळण्यास भाग पाडले होते. आणि लाँगऑनवरील मॅक्सवेलने सोपा झेल पूर्ण केल्यानंतर ही जोडी फुटली.
वॉर्नर बाद झाल्यानंतर संघाच्या त्याच धावसंख्येवर बेअरस्टो देखील बाद झाला. त्यालाही बिश्नोईनेच तंबूचा रस्ता दाखवला. 97 धावांवर असताना बेअरस्टोचा अंदाज चुकल्यानंतर चेंडू त्याच्या पॅडवर आदळला. प्रारंभी, मैदानी पंचांनी त्याला बाद दिले नव्हते. पण, पंजाबने डीआरएस घेतला आणि रिप्लेत तो बाद असल्याचे दिसून आले. दोन्ही सलामीवीर तंबूत परतल्यानंतर अब्दुल समद (8), मनीष पांडे (1), प्रियम गर्ग (0) अतिशय स्वस्तात बाद झाले आणि यामुळे दीडशतकी भागीदारी नोंदवली गेल्यानंतरही हैदराबादच्या धावसरासरीवर किंचीत परिणाम झाला.
अंतिम सत्रात केन विल्यम्सन व अभिषेक शर्मा (6 चेंडूत 12) यांनी फटकेबाजी केली व हैदराबादला 200 धावांच्या उंबरठय़ावर आणले. अंतिमतः विल्यम्सन 10 चेंडूत 20 तर रशीद खान (0) नाबाद राहिले.
हैदराबादने एक बदल करताना सिद्धार्थ कौलऐवजी खलील अहमदला संधी दिली तर पंजाबने 3 बदल करत जॉर्डन, ब्रार व सर्फराजऐवजी प्रभ्सिम्रन, अर्शदीप व मुजीबला खेळवले.
धावफलक
सनरायजर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर झे. मॅक्सवेल, गो. रवी बिश्नोई 52 (40 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), जॉनी बेअरस्टो पायचीत गो. रवी बिश्नोई 97 (55 चेंडूत 7 चौकार, 6 षटकार), अब्दुल समद झे. अर्शदीप, गो. बिश्नोई 8 (7 चेंडूत 1 चौकार), मनीष पांडे झे. व गो. अर्शदीप सिंग 1 (2 चेंडू), केन विल्यम्सन नाबाद 20 (10 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), प्रियम गर्ग झे. पूरन, गो. अर्शदीप 0 (1 चेंडू), अभिषेक शर्मा झे. मॅक्सवेल, गो. शमी 12 (6 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), रशीद खान नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 11. एकूण 20 षटकात 6 बाद 201.
गडी बाद होण्याचा क्रम :
1-160 (वॉर्नर, 15.1), 2-160 (बेअरस्टो, 15.4), 3-161 (मनीष पांडे, 16.1), 4-173 (समद, 17.5), 5-175 (प्रियम, 18.1), 6-199 (अभिषेक, 19.5).
गोलंदाजी :
कॉट्रेल 3-0-33-0, मुजीब-उर-रहमान 4-0-39-0, शमी 4-0-40-1, मॅक्सवेल 2-0-26-1, रवी बिश्नोई 3-0-29-3, अर्शदीप 4-0-33-2.
किंग्स इलेव्हन पंजाब : केएल राहुल झे. विल्यम्सन, गो. अभिषेक 11 (16 चेंडू), मायंक अगरवाल धावचीत (वॉर्नर-अहमद) 9 (6 चेंडूत 1 चौकार), पी. सिमरन सिंग झे. गर्ग, गो. अहमद 11 (8 चेंडूत 2 चौकार), निकोलस पूरन झे. नटराजन, गो. रशीद 77 (37 चेंडूत 5 चौकार, 7 षटकार), ग्लेन मॅक्सवेल धावचीत (गर्ग), 7 (12 चेंडू), मनदीप सिंग त्रि. गो. रशीद 6 (6 चेंडू), मुजीब-उर-रहमान झे. बेअरस्टो, गो. अहमद 1 (3 चेंडू), रवी बिश्नोई नाबाद 6 (7 चेंडूत 1 चौकार), मोहम्मद शमी पायचीत गो. रशीद 0 (1 चेंडू), कॉट्रेल त्रि. गो. नटराजन 0 (2 चेंडू), अर्शदीप सिंग झे. वॉर्नर, गो. नटराजन 0 (3 चेंडू). अवांतर 4. एकूण 16.5 षटकात सर्वबाद 132.
गडी बाद होण्याचा क्रम :
1-11 (मायंक, 1.3), 2-31 (सिमरन, 4.2), 3-58 (केएल राहुल, 6.4), 4-105 (मॅक्सवेल, 10.6), 5-115 (मनदीप, 12.3), 6-126 (रहमान, 13.5), 7-126 (पूरन, 14.5), 8-126 (शमी, 14.6), 9-132 (कॉट्रेल, 16.2), 10-132 (अर्शदीप, 16.5).
गोलंदाजी :
संदीप शर्मा 4-0-27-0, खलील अहमद 3-0-24-2, टी. नटराजन 3.5-0-24-2, अभिषेक शर्मा रशीद खान 4-1-12-3, अब्दुल समद 1-0-28-0.