प्रतिनिधी/ बेळगाव
महानगरपालिकेने बेकायदेशीररीत्या वाढविण्यात आलेल्या घरपट्टीबद्दल जनतेने घाबरू नये. याबाबत पालकमंत्री रमेश जारकीहोळी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाली असून वाढविलेली घरपट्टी कमी करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तेव्हा 31 जुलै ही कर भरण्याची शेवटची तारीख म्हणून जनतेने घाबरू नये, असे आवाहन माजी नगरसेवक संघटनेने केले आहे.
रामदेव गल्ली, गिरीश कॉम्प्लेक्स येथील भगतसिंग सभागृहात माजी नगरसेवकांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष नागेश सातेरी होते. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱयांची शुक्रवारी भेट घेण्यात येणार आहे. कोरोना संदर्भातही आयएमएच्या प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्यासमोर अडीअडचणी मांडण्याचा ठराव करण्यात आला आहे.
प्रारंभी माजी नगरसेवक दीपक वाघेला यांनी स्वागत केले. या आधी झालेल्या बैठकीची आणि मंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेची माहिती दिली. यावेळी आप्पासाहेब पुजारी, लतिफखान पठाण, वर्षा आजरेकर, रेणू किल्लेकर, शीला देशपांडे, नेताजी जाधव, रणजीत पाटील, फिरदोस दर्गा, संभाजी चव्हाण, शिवाजी सुंठकर, मालोजी अष्टेकर, संजीव प्रभू यांनी विचार व्यक्त केले.
बैठकीमध्ये माजी नगरसेवकांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या अडचणींबाबत विचार मांडले. या सर्व अडचणी जिल्हाधिकाऱयांच्या निदर्शनास आणून देण्यात येतील, असे आश्वासन अध्यक्ष नागेश सातेरी यांनी दिले. कोरोनाविरुद्ध लढणाऱया सर्वांचे कौतुक करण्यात आले. जनतेने मनामध्ये भीती न बाळगता कोरोनाचे नियम पाळत कोरोनाशी टक्कर द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीला राजन हुलबत्ते, राजकुमार मुर्कीभावी, महम्मदरसुल मुल्ला, सतीश मार्दोळकर, शाम कोलकार, राजेश तिरकण्णावर, मोहन चिगरे व इतर माजी नगरसेवक उपस्थित होते.