मिरज / प्रतिनिधी
मिरज तालुक्यातील बेडग येथे 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी याच गावातील लक्ष्मण गेणू कारंडे (वय 29, रा. चुनाभट्टी) यास पोलिसांनी तात्काळ अटक केली. गुरूवारी रात्री 11 च्या सुमारास गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ सदरचा प्रकार घडल्याने ग्रामस्थांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. न्यायालयाने त्यास 27 एप्रिलपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
वाळवा तालुक्यातील भवानीनगर येथे राहणारी 12 वर्षाची मुलगी एक महिन्यांपासून बेडग गावी आपल्या काकीकडे रहावयास आली आहे. गुरूवारी रात्री ती शौचालयास घराबाहेर पडली असता, आरोपी लक्ष्मण कारंडे याने तिचा पाठलाग केला. लगतच असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या कोपऱ्यातील खोलीमध्ये तिला घेऊन जावून तिच्या अंगावरील सर्व कपडे काढून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीने तिचे मोबाईलवर अनेक फोटोही काढले. ती ओरडू नये म्हणून तिच्या तोंडात रुमाल कोंबण्यात आला होता. शिवाय आवाज करु नकोस, असा दमही दिला.
बराचवेळ झाला तरी मुलगी शौचालयातून परत न आल्याने काकीने शोधाशोध सुरू केली. तिच्या नावाने हाका मारताच शेजापाजारीही जमा झाले. नागरिकांना गोंगाट ऐकून आरोपी लक्ष्मण कारंडे याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. घडला प्रकार लक्षात येताच नागरिकांनी त्यास बेदम चोप देऊन पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक संदीपसिंग गील, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मिलींद पाटील तात्काळ घटनास्थळी धावले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, आरोपीला तात्काळ अटक केली. यावेळी त्याच्याजवळील फोटो काढलेला मोबाईल जफ्त केला आहे. मुलीचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयाने 27 एप्रिल पर्यंतची पोलिस कोठडी दिली असल्याची माहिती निरीक्षक मिलींद पाटील यांनी दिली.