बेळगाव
कोरोना महामारीमुळे सरकारी व खासगी इस्पितळे रुग्णांनी तुडुंब भरली आहेत. काही ठिकाणी बेड असूनही रुग्णांना प्रवेश दिला जात नाही, अशी परिस्थिती आहे. बेड नाहीचा फटका इंदिरानगर-हत्तरगी येथील एका निवृत्त शिक्षकाला बसला आहे. बेळगाव येथील पाच खासगी इस्पितळे फिरूनही या वृद्धावर उपचार झाले नाहीत. अखेर त्या वृद्धाचा मृत्यू झाला आहे.
आप्पाण्णा लगमा नौकुडी (वय 75) असे या दुर्दैवी वृद्धाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कोचरी, ता. हुक्केरी येथील सरकारी प्राथमिक शाळेत शारीरिक शिक्षक म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. रविवारी पहाटे साडेचार वाजता त्यांचे निधन झाले. खडेबाजार पोलीस स्थानकातील बसवराज नौकुडी यांचे ते वडील होत.
उपलब्ध माहितीनुसार श्वसनाचा त्रास जाणवल्यामुळे शनिवारी सकाळी आप्पाण्णा यांना बेळगावला आणण्यात आले. सकाळी साडेदहा ते सायंकाळपर्यंत शहरातील पाच नामवंत इस्पितळाच्या पायऱया झिजविण्यात आल्या. सिटी स्कॅन, कोरोनाची चाचणी आदी सर्व चाचण्या झाल्या. कोरोना तपासणी निगेटिव्ह आली. तरी त्यांचा त्रास काही कमी होईना.
मुलगा व कुटुंबीयांनी खासगी इस्पितळांच्या चकरा मारून आमच्या वडिलांना दाखल करून घ्या, अशी विनवणी केली. त्यांना कुठेच बेड नाही, असे सांगण्यात आले. रविवारी पुन्हा प्रयत्न करूया, म्हणून शनिवारी सायंकाळी त्यांना हत्तरगीला नेण्यात आले. रविवारी पहाटे त्यांचे निधन झाले. शहर परिसरात असे अनेक प्रकार घडत असून उपचारांविना अनेकांचे मृत्यू होताना दिसत आहेत.