प्रतिनिधी / सांगली
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने विविध मागण्यांसाठी बेमुदत शाळा बंद आंदोलनाची नोटीस शासनास दिली होती. शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना निवेदन देऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा महामंडळ अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील व शिष्टमंडळाने केली. सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मंत्री गायकवाड यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. त्यामुळे दिनांक १५ जानेवारी पासून बेमुदत शाळा बंद आंदोलन तूर्त स्थगित केल्याचे विजय नवल पाटील यांनी जाहीर केल्याचे महामंडळ खजिनदार रावसाहेब पाटील यांनी सांगितले.

शाळांना कोविड प्रतिबंधक खर्च, वेतनेतर अनुदान, माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याबरोबर झालेल्या मीटिंगच्या इतिवृत्ताची अंमलबजावणी, भत्त्यावर चतुर्थ श्रेणी कर्मचारी नियुक्ती रद्द करणे, शालार्थ आयडी मंजूरी, ६ वी व ७वी चे वर्ग खाजगी शिक्षण संस्थेच्या शाळांना जोडणे, औरंगाबाद, मुंबई, नाशिक येथील विद्यार्थी संख्या कमी झालेल्या शाळा भाडेतत्त्वावर खाजगी शिक्षण संस्थांना देणे, मुख्याध्यापक नियुक्ती सेवाज्येष्ठते ऐवजी अप्टीट्यूड टेस्ट घेऊन करणे, ७० वर्षापेक्षा अधिक जुन्या शाळांना इमारत दुरुस्तीसाठी आर्थिक मदत देणे, शाळा व महाविद्यालयीन इमारती करमुक्त करणे, शाळेत एकतरी महिला शिपाई नेमणूक, आरटीई कायद्याची काटेकोर अंमलबजावणी, शाळांना सौर ऊर्जा साधने उपलब्ध करून देणे, कोठारी कमिशन शिफारसींनुसार शिक्षणावर किमान ६%खर्च करणे, शाळा तेथे संगणक ऑपरेटर नेमणे, क्रीडांगण विकास व शारीरिक शिक्षक नियुक्ती व नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी समितीवर महामंडळ प्रतिनिधी घेणे व इतर अन्य मागण्यांवर सविस्तर सकारात्मक चर्चा झाली आहे त्यामुळे हे आंदोलन स्थगित केले आहे.