जिल्हय़ात 136 रुग्णांवर उपचार सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाच्या दुसऱया लाटेनंतर सुरू झालेली ब्लॅक फंगसची लागण अद्यापही कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून सध्या जिल्हय़ात 136 ब्लॅक फंगस बाधितांवर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. तर आतापर्यंत 48 जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी तरुण भारतने जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांच्याशी संपर्क साधला असता ही माहिती मिळाली आहे. जिल्हय़ात अद्याप ब्लॅक फंगसचा धोका कायम आहे. बाधितांवर सिव्हिल हॉस्पिटल व वेगवेगळय़ा खासगी इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
उपलब्ध माहितीनुसार 461 संशयितांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 432 जणांना ब्लॅक फंगसची लागण झाल्याचे तपासणी अहवालांतून स्पष्ट झाले आहे. यापैकी 282 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत. उर्वरित रुग्णांवर वेगवेगळय़ा खासगी इस्पितळांमध्ये उपचार करण्यात आले आहेत.
आतापर्यंत 249 हून अधिक जण उपचारांती पूर्णपणे बरे झाले आहेत. अद्याप 136 ब्लॅक फंगस बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्हय़ात ब्लॅक फंगस बाधितांची संख्या वाढत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
तज्ञांच्या मते कोरोनाची तिसरी लाट थोपवायची असेल तर लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे. प्रत्यक्षात गेल्या तीन -चार दिवसांपासून लसींचा तुटवडा सुरू झाला आहे. उपलब्ध साठा कमी आहे. कोव्हॅक्सीन तर उपलब्ध नाही. थोडय़ाफार प्रमाणात कोव्हिशिल्ड दिले जात आहे. लसींचा पुरवठा कमी झाल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱयांनी कबूल केले आहे.