एक लोकसभा, दोन विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणूक जाहीर : आचारसंहिता जारी : उमेदवार निवडीच्या प्रक्रियेला वेग येणार

प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील जनतेचे लक्ष केंद्रीत झालेल्या बेळगाव लोकसभा आणि बिदर जिल्हय़ातील बसवकल्याण तसेच रायचूर जिल्हय़ातील मस्की विधानसभा मतदारसंघांचे पोटनिवडणूक वेळापत्रक मंगळवारी जाहीर झाले आहे. या तिन्ही मतदारसंघांमध्ये 17 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र, विजापूर जिल्हय़ातील सिंदगी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घोषणा करण्यात आलेली नाही. पोटनिवडणुकीची घोषणा झालेल्या मतदारसंघांच्या कार्यक्षेत्रात मंगळवारी सायंकाळपासूनच आचारसंहिता जारी झाली आहे.
राज्यातील दोन विधानसभा आणि एक लोकसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. वेळापत्रकानुसार 23 मार्च रोजी अधिसूचना जारी होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होईल. अर्ज दाखल करण्यासाठी 30 मार्च शेवटचा दिवस आहे. तर 31 मार्च रोजी अर्ज छाननी होणार आहे. उमेदवारांना माघार घेण्यासाठी 3 एप्रिल शेवटची तारीख आहे. 17 एप्रिल रोजी मतदान होईल तर 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
पोटनिवडणूक घोषित झाल्याने आता राजकीय पक्षांकडून उमेदवार निवडीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. देशातील पाच राज्यांच्या विधानसभांसाठी निवडणूक घोषणा करण्यात आल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीसाठी लवकरच स्वतंत्र अधिसूचना काढण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. तेव्हापासून राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आता पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे लवकरच विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळण्यात येण्याची शक्यता आहे.
राज्यातील रिक्त असणाऱया तिन्ही विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, निवडणूक आयोगाने बसवकल्याण आणि मस्की या दोनच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक जाहीर केली आहे. मात्र, विजापूर जिल्हय़ातील सिंदगी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही. सिंदगी मतदारसंघातील निजद आमदार एम. सी. मनगुळी यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.
बेळगावच्या इतिहासात दुसऱयांदा लोकसभेची पोटनिवडणूक
बेळगाव जिल्हय़ाच्या राजकीय इतिहासात दुसऱयांदा लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. दोन्ही निवडणुका केंदातील राज्यमंत्र्यांच्या निधनामुळेच घेण्याची परिस्थिती निर्माण झाली. 1962 मध्ये केंद्रीय गृहखात्याचे राज्यमंत्री बळवंतराव दातार यांचे आजाराने निधन झाले होते. त्यामुळे 1963 मध्ये बेळगाव लोकसभेसाठी पोटनिवडणूक झाली होती. तर मागील वर्षी 23 सप्टेंबर 2020 रोजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन झाले होते. याकरिता 17 एप्रिल रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघात मागील चार निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. आता कोणाला तिकीट मिळणार? याकडे लक्ष केंद्रीत झाले आहे. येथून सुरेश अंगडी यांच्या कुटुंबातील सदस्याला तिकीट देण्याची मागणी होत आहे. त्याचप्रमाणे जिल्हय़ातील अनेक नेते रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसमध्ये देखील उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
सुरेश अंगडींच्या निधनामुळे पोटनिवडणूक बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे दिल्लीत निधन झाले होते. त्यामुळे बेळगावात पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेस-निजद युतीचे सरकार असताना काँग्रेस आमदार प्रतापगौडा पाटील यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे मस्की मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. तर बसवकल्याणचे काँग्रेस आमदार नारायणराव यांचे निधन झाल्यामुळे येथेही पोटनिवडणूक होणार आहे.
मतदारसंघ | मतदान केंद्रांची संख्या | मतदार संख्या |
बेळगाव (लोकसभा) | 2064 | पुरुष – 9,10,151 महिला – 9,01,433 इतर – 58 एकूण – 18,11,642 |
बसवकल्याण (विधानसभा) | 264 | पुरुष – 1,24,841 महिला – 1,14,628 इतर – 4 एकूण – 2,39,473 |
मस्की (विधानसभा) | 231 | पुरुष – 1,01,301 महिला – 1,05,040 इतर – 13 एकूण – 2,06,354 |
12 राज्यांमधील पोटनिवडणूक जाहीर
निवडणूक आयोगाने 12 राज्यांमधील 14 विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीची घोषणा मंगळवारी केली आहे. याचबरोबर कर्नाटक तसेच आंध्रप्रदेशातील लोकसभेच्या एका मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. सर्व मतदारसंघांमध्ये 17 एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
राजस्थानातील 3 तर मध्यप्रदेशातील एका विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. राजस्थानात सहाडा, सुजानगढ आणि राजसमंद मतदारसंघात पोटनिवडणूक होईल. सहाडा मतदारसंघ काँग्रेस आमदार कैलास त्रिवेदी आणि सुजानगढ मतदारसंघात मास्टर भंवरलाल यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे. तर राजसमंद मतदारसंघात भाजप आमदार किरण माहेश्वरी यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होणार आहे. तर उदयपूर जिल्हय़ातील वल्लभनगर मतदारसंघातील पोटनिवडणूक जाहीर करण्यात आलेली नाही.
मध्यप्रदेशात दमोह विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेस आमदार राहुल सिंग लोधी भाजपमध्ये सामील झाल्याने ही पोटनिवडणूक होणार आहे. पोटनिवडणूक घोषित झाल्याने आता राजकीय पक्षांकडून उमेदवार निवडीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.
राज्यनिहाय पोटनिवडणूक विधानसभा
- राजस्थान (3 जागा) : सहाडा, सुजानगढ, राजसमंद
- मध्यप्रदेश (1 जागा) : दमोह
- गुजरात (1 जागा) : मोरवा हदफ
- महाराष्ट्र (1 जागा) : पंढरपूर
- उत्तराखंड (1 जागा) : सल्ट
- झारखंड (1 जागा) : मधुपूर
- कर्नाटक (2 जागा) : बसवकल्याण, मस्की
- मिझोरम (1 जागा) : सेरछिप
- नागालँड (1 जागा) : नोकसेन
- ओडिशा (1 जागा) : पिपिली
- तेलंगणा (1 जागा) : नागार्जुन सागर
- लोकसभा मतदारसंघ
- आंध्रप्रदेश (1 जागा) : तिरुपती
- कर्नाटक (1 जागा) : बेळगाव