बाधितांची संख्या 110 वर, कुडची, हिरेबागेवाडी येथील दोघे कोरोनामुक्त
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हय़ातील आणखी दोघा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी कर्नाटकात आतापर्यंतचे सर्वाधिक 99 जणांचे स्वॅब तपासणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये निपाणी येथील एक महिला व कुडची येथील तरुणाचा समावेश आहे. जिल्हय़ातील बाधितांची संख्या 110 वर पोहोचली आहे.
सुरुवातीला बेळगाव येथील महिला असा उल्लेख झाला होता. (हेल्थ बुलेटिन माहितीनुसार) मात्र रुग्ण क्रमांक 1227 ही 23 वषीय महिला निपाणी येथील असल्याची माहिती मिळाली आहे. तर कुडची येथील रुग्ण क्रमांक 1226 या 23 वषीय तरुणाला कोरोनाची बाधा झाली असून रुग्ण क्रमांक 575 महिलेच्या संपर्कातून त्याला लागण झाली आहे.
1 मे रोजी कुडची येथील 30 वषीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आता तिच्या संपर्कातील 23 वषीय तरुणाचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर मुंबईहून निपाणीला आलेल्या 23 वषीय महिलेलाही कोरोनाची बाधा झाली असून 12 मे रोजी कोगनोळी तपास नाक्मयावर ही महिला, तिचा पती व मुलीला अडविण्यात आले होते. प्रशासनाने त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवले होते. हे सर्व जण मुंबई येथील मातुंगाहून निपाणीला आल्याची माहिती मिळाली आहे. सोमवारी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या महिलेसह दोघा जणांना सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाला आणखी 48 अहवालांची प्रतीक्षा असून हे अहवाल उपलब्ध झाल्यानंतर जिल्हय़ातील चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्हा सर्वेक्षण विभागाने सोमवारी रात्री दिलेल्या माहितीनुसार जिल्हय़ातील 8 हजार 290 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले असून 96 जणांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 6 हजार 993 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून यापैकी 6 हजार 707 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 110 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
98 जणांचे अहवाल निगेटिव्ह
जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात 98 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रविवारच्या अहवालानुसार प्रशासनाला 146 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा होती. यापैकी 98 अहवाल निगेटिव्ह आले असून आणखी 48 जणांच्या अहवालांची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत 67 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 50 बाधितांवर सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत.
आतापर्यंत 67 जण झाले बरे
कोरोनामुक्त झालेल्या दोघा जणांना सोमवारी सिव्हिल हॉस्पिटलमधून घरी पाठविण्यात आले. कुडची (ता. रायबाग) येथील रुग्ण क्रमांक 223 व हिरेबागेवाडी येथील रुग्ण क्रमांक 596 या दोघा जणांना घरी पाठविण्यात आले. यापुढे आणखी 14 दिवस घरातच राहण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 67 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.