डिसेंबर 2021 पर्यंत हायटेक रेल्वेस्थानक बेळगावकरांच्या सेवेत दाखल होणार : 190 कोटी निधीतून रेल्वेस्थानकाचा कायापालट

प्रतिनिधी /बेळगाव
ब्रिटिशकालीन असलेल्या बेळगाव रेल्वेस्थानकाला हायटेक स्वरूप दिले जात आहे. विमानतळ टर्मिनलप्रमाणे बेळगावमध्ये अत्याधुनिक असे रेल्वेस्थानक उभारले जात आहे. एकूण 190 कोटी रुपये खर्च करून रेल्वेस्थानकाचा विकास केला जात आहे. तीन मजली भव्य प्रवेशद्वार, दक्षिण भागासाठी आणखी एक दुमजली प्रवेशद्वार, रेल्वे दुरुस्तीसाठी कोचिंग डेपो, तसेच यार्ड उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबर 2021 पर्यंत हायटेक रेल्वेस्थानक बेळगावकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.
2019 मध्ये बेळगाव रेल्वेस्थानकाच्या नुतनीकरणाला मंजुरी मिळाली. तत्कालिन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्ष नुतनीकरणाच्या कामाला सुरुवात होण्यास काहीसा वेळ लागला. त्यानंतर 2020 मध्ये लॉकडाऊनमुळे कामगार आपापल्या गावी परतल्याने काही दिवस काम रखडले होते. परंतु आता काम प्रगतिपथावर असून आरसीसी काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम येत्या काही महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेचे साहाय्यक विभागीय अभियंते महेश बराळे यांनी दिली.
तीन मजली मुख्य प्रवेशद्वार
रेल्वेस्थानकाला भव्य असे प्रवेशद्वार उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. एकूण तीन मजली असणारे हे प्रवेशद्वार प्लॅटफॉर्म क्र. 1 ला लागून असणार आहे. या इमारतीमध्ये खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच शॉपिंग स्टॉल पहिल्या व दुसऱया मजल्यावर असणार आहेत. या प्रवेशद्वाराच्या समोर पार्किंगची व्यवस्था स्वतंत्र पद्धतीने केली जाणार आहे. दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहने या ठिकाणी पार्क करता येणार आहेत. या संपूर्ण कामासाठी एकूण 44 कोटी रुपये खर्च येणार आहे.
दक्षिण प्रवेशद्वारासाठी 18 कोटी रुपये खर्च येणार
बेळगाव शहराच्या दक्षिण भागातील नागरिकांना रेल्वेस्थानकात प्रवेश करण्यासाठी गोगटे सर्कल पार करून यावे लागत होते. यासाठी गुड्सशेड रोड येथे दक्षिण प्रवेशद्वार उभारण्याचे काम सुरू आहे. हे प्रवेशद्वार दोन मजली असणार आहे. या प्रवेशद्वाराचे आरसीसी काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी 18 कोटी रुपये खर्च येणार आहे.
कोचिंग डेपो-यार्डचीही उभारणी…
रेल्वेचे डबे व इंजिन दुरुस्तीसाठी यापूर्वी हुबळी येथील वर्कशॉपमध्ये काम करावे लागत होते. परंतु लहान दुरुस्ती यापुढे बेळगावमध्येही करता येणार आहे. यासाठी रेल्वेस्थानकावर कोचिंग डेपो उभारण्यात आला आहे. यासाठी 600 चौरस मीटर कोचिंग डेपो उभारण्यात आला आहे. यामध्ये मशिनरी व इतर साहित्य बसविले जाणार आहे. यासाठी 48 कोटी रुपये खर्च येणार आहे. प्लॅटफॉर्म क्र. 4 वर यार्ड उभारण्याचे काम सुरू असून यासाठी 80 कोटी रुपये खर्च येणार आहे.