परिवहन मंडळाचे अधिकारी, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : विद्यार्थी-प्रवाशांची गैरसोय : मोर्चा काढण्याचा नागरिकांचा इशारा
वार्ताहर / किणये
तालुक्मयाच्या पश्चिम भागातील बेळवट्टी-बाकनूर भागात बससेवेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. अनियमित व अपुऱया बसफेऱयामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱयांना वारंवार सांगूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रारी या परिसरातील प्रवासी वर्गातून होत आहेत. येत्या चार दिवसात या परिसरात वेळेवर बस सेवा सुरू करण्यात यावी अन्यथा मोर्चा काढण्याचा इशारा ही नागरिकांनी दिला आहे.
अपुऱया व अनियमित बसफेऱयांमुळे प्रवाशांना तासनतास बसथांब्यावर ताटकळत बसावे लागत आहे. लोकप्रतिनिधींकडून आश्वासन मिळते. मात्र, त्याची पूर्तता होत नसल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींनी या भागातील बस सेवेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
बेळवट्टी ,बाकनूर, इनाम बडस, सोनोली या भागातील प्रवाशांना सध्या अपुऱया व अनियमित बससेवेचा सामना करावा लागत आहे. बस कधीही वेळेवर येत नसल्यामुळे येथील नागरिक अक्षरशा वैतागले आहेत.
दि. 1 फेब्रुवारीपासून नववी व दहावीचे वर्ग नियमितपणे सुरू करण्यात आले आहेत. तसेच महाविद्यालयातील प्रथम वर्षालाही प्रारंभ केला आहे. आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहरातील हायस्कूल, कॉलेजला यावे लागत आहे.
पश्चिम भागातील काही गावातून विद्यार्थी व प्रवासी रोज बेळगावला ये-जा करतात. मात्र बस कधी येते याचा नेम नसल्यामुळे थांब्यावर अर्धा दिवस बसून राहावे लागत आहे अशी माहिती प्रवाशांकडून मिळाली आहे. रोज शेतकऱयांना बाजार व इतर खरेदी तसेच सरकारी कार्यालयातील कामकाजासाठी बेळगावला यावे लागते. मात्र बेळगावला ये-जा करण्यासाठी वेळेत बस नसल्याने त्यांचा वेळ वाया जात आहे.ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रशासनामार्फत नेहमीच विविध योजना राबविल्या जातात. वेगवेगळय़ा योजनांच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधीही खर्ची दाखविण्यात येतो. मात्र, या भागात कायमस्वरूपी व नियमित बस सुरू ठेवण्यासाठी प्रशासन योजना का राबवत नाही. असा सवाल या भागातील नागरिकांतून उपस्थित होऊ लागला आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
ग्रामीण भागातील विद्यार्थी माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी बेळगाव येतात. मात्र या पासधारक विद्यार्थ्यांचा अधिक वेळ बसची वाट पाहण्यातच जातो.अनियमित बसमुळे त्यांना शाळेत वेळेवर पोहोचता येत नाही. काही गावातील विद्यार्थ्यांना घरी पोहोचायला रात्री उशीर होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या भागातील विविध गावांमधून अनेकदा राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱयांना निवेदन देऊनही बससेवा सुरू केली नाही अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम-एन. के. नलवडे

बेळवट्टी गावाला सुरळीत बससेवा नाही. यामुळे विद्यार्थ्यांना याचा अधिक फटका बसत आहे. दुपारच्या वेळेत बस फेरी नसते. त्यामुळे प्रवाशांना बस थांब्यावर बसून राहावे लागते. तसेच बेळवट्टी हायस्कूलला बेटगिरी, गोल्याळी, तळवटे, मोरब इनाम बडस येथील विद्यार्थी येतात हे विद्यार्थीही बसने प्रवास करतात. मात्र वेळेत बस नसल्यामुळे त्यांना शाळेत वेळेवर हजर राहता येत नाही. यामुळे आता आम्ही मोर्चा करण्याच्या तयारीत आहोत
परिवहन मंडळ अधिकाऱयांची परिसराकडे पाठ-रामलिंग पाटील

या परिसरात बससेवा सुरळीत नाही. गेले कित्येक महिने आम्ही बस सेवा सुरळीत करण्यासाठी धडपड करीत आहोत मात्र राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱयांनी या परिसराकडे पाठ फिरवली आहे. बस फेऱया वेळेत नसल्यामुळे शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे कारण बेळगावला ये-जा करावी म्हणजे पूर्ण दिवस खर्च होऊ लागला आहे. बसच्या प्रवासावर अवलंबून राहणाऱया आम्ही सर्वसामान्य लोकांनी दाद कोणाकडे मागायची?
बससेवा सुरळीत करण्यासाठी मोर्चा काढणार-बळवंत लोहार

सोनोली गावाला स्वतंत्र बससेवा नाही. राकसकोप व बेळगुंदी गावच्या बस वरच आम्हाला अवलंबून राहावे लागते. अलीकडे राकसकोप गावाला जाणारी बस वेळेवर जात नाही याचा फटका सर्व प्रवासी वर्गाला बसू लागला आहे. या भागात बस सेवा सुरळीत करण्यासाठी आता तरुण व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मोर्चा काढणार आहोत.