‘कलरकॉन एशिया’ कंपनीने राबविला पेयजल प्रकल्प, ‘व्हॉलंटरी हेल्थ असोसिएशन’कडून लोकसहभागातून उभारणी

प्रसाद तिळवे /सांगे
बोरिगोट्टो हा सांगे तालुक्मयाला जोडून असलेल्या केपे तालुक्मयातील डोंगराळ व दुर्गम भागात वसलेला छोटासा गाव आहे. बाळ्ळी-फातर्पा मुख्य रस्त्याच्या आंत आणि मोरपिर्ला पंचायतीच्या कक्षेत तो आहे. येथे एक परिपूर्ण, शाश्वत ग्रामीण पायाभूत सुविधा निर्माण केल्याचे पाहावयास मिळत आहे. बोरिगोट्टो गावामध्ये दरवषी उन्हाळय़ात पाण्याची टंचाई भासत असे. वेर्णा येथील कलरकॉन एशिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आपल्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीतून गावात पिण्याच्या पाण्याची पायाभूत सुविधा निर्माण करून गावातील पाणी समस्येवर मात केली आहे. यामुळे गावातील लोकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
2015 मध्ये ‘आरोग्य एक्सप्रेस मोबाईल हेल्थकेअर’च्या माध्यमातून सांगे व केपे तालुक्मयांतील दुर्गम गावांमध्ये सुरू झालेली कामे पुढे नेताना कलरकॉन एशिया कंपनीने आजवर आरोग्य सुविधांच्या व्यतिरिक्त अनेक विकास प्रकल्प राबवून गावांना स्वयंपूर्ण बनविले आहे. अत्यंत दुर्गम अशा नुने, मानगाळ, वाग्रेगाळसारख्या काही गावांत अत्यंत यशस्वीपणे जलप्रकल्प राबविण्यात आले असून तेथे भेटी देऊन पाहणी करून ते अनुभवता येते.
बोरिगोट्टो पाणी प्रकल्पामुळे वर्षभर तेथील घरांना 24 तास स्वच्छ, पिण्यायोग्य पाणी उपलब्ध झाले आहे. तसेच डोंगरमाथ्यावरून येणारे पाणी मोठय़ा टाकीमध्ये साठवले जाते आणि गावात 12 अन्य सामान्य टाक्मया निर्माण करून त्याद्वारे गावातील 65 घरांना पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. या लोकांना त्याचा फायदा होणार आहे. गावात कलरकॉनने जलप्रकल्प राबविल्याने ग्रामस्थांची उत्तम प्रकारे सोय झाली आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दिलेल्या मदतीबद्दल कंपनीचे सर्वेश परब यांनी लोकांची प्रशंसा केली आहे.
उन्हाळय़ात पाण्यासाठी व्हायचे हाल
जेव्हा आम्हाला पाणी प्रकल्पासाठी गावकऱयांनी विनंती केली तेव्हा बोरिगोट्टो गावाला फेब्रुवारीनंतर पाण्याची टंचाई भासत असल्याचे कळले. डोंगरमाथ्यावरून येणाऱया पाण्याचा स्रोत आटल्यानंतर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असे. त्यानंतर गावकऱयांना टँकरवर अवलंबून राहावे लागे किंवा पाण्यासाठी महामार्गावरून 5 किलोमीटर दूर जावे लागे ही वस्तुस्थिती होती. त्यामुळे कलरकॉन कंपनीने लोकांची विनंती स्वीकारली, त्याचा सखोल अभ्यास केला आणि नवीन योजना आखली. त्याकरिता नवीन विहीर खोदली गेली तसेच कायमस्वरूपी स्रोत निर्माण केला गेला.
लोकसहभागातून योजनेची अंमलबजावणी
मुळात येथील जलाशयाची दुरुस्ती करून साफसफाई लोकांनीच केली. लोकसहभागातून ही पेयजल योजना राबविण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. ‘व्हीआयडी, कलरकॉन एशिया’ या उपक्रमांतर्गत ‘व्हीएचएजी’च्या मदतीने स्थानिक लोकांनी टेकडीच्या वरच्या जलाशयाची दुरुस्ती केली. तेथे नैसर्गिक पाणी गोळा होते. 4 किलोमीटर पाईपलाईनद्वारे जलाशयाचे पाणी मुख्य टाकीत आणले गेले. तसेच पर्यायी व्यवस्था म्हणून कलरकॉन एशियाने विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. कायमचा पाण्याचा स्रोत म्हणून या विहिरीचा वापर केला जाऊ शकतो. मुख्य जलाशयातून 12 सामान्य जलस्थानकांची व्यवस्था करण्यात आली आहे जी सर्व घरांना सुलभ पद्धतीने पाणीपुरवठा करते. एकूण 65 घरांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे, असे व्हॉलंटरी हेल्थ असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वैद्य यांनी सांगितले.
लोकांचा संघर्ष संपला
पूर्वी लोकांना टँकरची वाट पाहावी लागत असे तसेच सकाळी लवकर पाणी मिळवण्यासाठी अनेक किलोमीटर पायी चालावे लागत असे. त्यामुळे दर्जेदार वेळ वाया जायचा आणि शेवटी त्यांना जे काही पाणी मिळायचे त्यावर समाधान मानावे लागत असे. आम्ही त्यांना घराजवळ पुरेसे पाणी मिळवून दिले. त्यामुळे पाण्यासाठीचा संघर्ष संपला. त्यांचा वेळ वाचला. आता ते शेतात काम करू शकतात, रोजच्या रोज नोकऱयांवर जाऊ शकतात आणि गावच्या इतर विकासात भाग घेऊ शकतात, अशी प्रतिक्रिया सर्वेश परब (एचआर संचालक, कलरकॉन एशिया) यांनी व्यक्त केली. या योजनेच्या वापरासाठी काही निधी गोळा केला जाईल आणि त्याचा वापर देखभाल व दुरुस्तीसाठी केला जाईल. जर सेवा विनामूल्य असेल, तर लोक त्याला किंमत देत नाहीत. मालकीची भावना हे सुनिश्चित करते की, ती वस्तू वा सेवा खराब होता कामा नये, ती दीर्घकाळ टिकली पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि स्वच्छताविषयक उपक्रमांद्वारे गरजू लोकांपर्यंत आणि गावांपर्यंत पोहोचण्यावर कलरकॉनचा नेहमीच भर असतो, असे परब यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पाचे काही दिवसांपूर्वी उद्घाटन झाले आहे आणि त्याच्या देखभालीची जबाबदारी लोकांवर सोपवण्यात आली आहे. या प्रकल्पाची मालकी गावकऱयांची आहे आणि त्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे, असे लोकांना सांगण्यात आले आहे. या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च कलरकॉन एशिया यांच्याद्वारे सीएसआर उपक्रमाच्या अंतर्गत करण्यात आला आहे. प्रकल्पाची उभारणी ग्रामपंचायत, स्थानिक पंच आणि गावातील स्थानिकांच्या मदतीने ‘व्हॉलंटरी हेल्थ असोसिएशन’ने केली आहे.