कणगलेनजीक घटना : एक जखमी, चालक फरार
प्रतिनिधी /संकेश्वर
भरधाव मालवाहू बोलेरोने समोरून जाणाऱया स्विफ्ट डिझायरला जोराची धडक दिली. या अपघातात चालकासह युवती जागीच ठार झाली. तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना मंगळवार दि. 15 रोजी दुपारी 3 च्या सुमारास कणगलेनजीक पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर घडली. प्रशांत कल्लाप्पा कोलारगी (वय 24 रा. कमतनूर) व श्रद्धा तेलसंगमठ (रा. अथणी) अशी मृतांची नावे आहेत. तर नागराज मोहन चौगुला (रा. अम्मणगी) असे किरकोळ जखमीचे नाव आहे.
कारचालक प्रशांत कोलारगी, मैत्रीण श्रद्धा तेलसंगमठ व मित्र नागराज चौगुला हे तिघे स्विफ्टने तवंदी घाटातील हॉटेल व्हॉईटहाऊसमध्ये जेवण आटोपून संकेश्वरच्या दिशेने येत होते. याचवेळी मालवाहू बोलेरो निपाणीकडून कणगलेच्या दिशेने येत होती. कणगला सर्कलवर येताच बोलेरोची कारला जोराची धडक बसल्याने कारमधील प्रशांत व श्रद्धा या दोघांना जबर मार लागून ते जागीच ठार झाले. तर कारच्या मागील शिटवर बसलेला नागराज किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला आहे. पोलिसांनी बोलेरो ताब्यात घेतली असून चालक फरार झाला आहे.