3 जण गंभीर जखमी : दहशतवादी हल्ला
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनच्या रीडिंग शहरातील एका उद्यानात झालेल्या चाकू हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी या घटनेला दहशतवादी हल्ला संबोधिले आहे. घटनास्थळावरून 25 वर्षीय युवकाला अटक केली आहे.
हा हल्ला फॉरबरी गार्डनमध्ये संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास (भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी रात्री 11.30 वाजता) झाला आहे. हल्ल्याच्या तपासासाठी दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱयांना पाचारण करण्यात आले आहे. अटकेतील युवक लीबियाचा नागरिक असल्याचे समजते. दहशतवाद्याने चाकू उगारून क्राउन कोर्टनजीक लोकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली होती. या हल्ल्याशी संबंधित मोबाईल चित्रण असल्यास ते सुरक्षा यंत्रणांना उपलब्ध करावे. पीडित कुटुंबांचा सन्मान करत याची चित्रफित किंवा छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित करू नयेत असे आवाहन पोलिसांनी केली आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी हल्ल्यातील बळींबद्दल दुःख व्यक्त केले आहे.