आप्पाचीवाडी-कुर्ली हालसिद्धनाथ यात्रेला प्रारंभ : भाविकांची गर्दी
वार्ताहर /कोगनोळी
श्री क्षेत्र आप्पाचीवाडी-कुर्ली (ता. निपाणी) येथील श्री हालसिद्धनाथ देवाच्या भोंब यात्रेला 11 रोजी भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. यावेळी हालसिद्धनाथांच्या नावानं चांगभलं।़।़।़।़ चा गजर करत भंडाऱयाची उधळण करण्यात आली. आप्पाचीवाडी येथील खडक मंदिरात रायबागचे प्रमुख मानकरी बागेवाले बंधू यांच्या हस्ते कर बांधून यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी पुजारी, मानकरी, यात्रा कमिटीचे पदाधिकारी व हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा भर पावसात पार पडला.
मंगळवारी सकाळी 9 वाजता मानाची घोडी, पालखी ढोलच्या गजरात कुर्ली येथून हालसिद्धनाथांचे सर्व मानकरी व भाविक आप्पाचीवाडीकडे रवाना झाले. घुमट मंदिर येथे धर्मिक विधी झाल्यानंतर पालखी मिरवणूक वाडा मंदिराकडे रवाना झाली. वाडा मंदिरात धर्मिक विधी पार पडला. वाडा मंदिरातून उत्सव मूर्ती व पालखी खडक मंदिराकडे रवाना झाली. तेथून सबिना मंदिर प्रदक्षिणा करून पालखी मंदिरात आली. या ठिकाणी उत्सव मूर्तीची प्रति÷ापना करून कर बांधण्यात आली. यावेळी धर्मिक विधी व ढोल वादनाचा कार्यक्रम पार पडला.
दि. 12 रोजी रात्री ढोलजागर व श्रींची पालखी सबिना, 13 रोजी श्रींची पालखी सबिना व रात्री पहिली भाकणूक, 14 रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी महानैवेद्य, रात्री श्रींची पालखी सबिना व रात्री दुसरी भाकणूक होणार आहे. 15 रोजी सकाळी 7 वाजता घुमटातील मंदिरात भाकणूक, दुपारी 4 वाजता श्रींची पालखी सबिना व यात्रेची सांगता होणार आहे.
यात्रा काळात सौंदलगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे मोफत आरोग्य सेवा देण्यात येत आहे. तसेच यात्रा काळात 5 दिवस शाळा आवारात हालसिद्धनाथ सेवा संस्थेतर्फे भाविकांसाठी मोफत अन्नदानाची व्यवस्थाही केली आहे. भाविकांसाठी कोल्हापूर, कागल, निपाणी, चिकोडी, रायबाग, गारगोटी व संकेश्वर येथून जादा बसेसची सोय केली आहे.
यात्रेसाठी जोल्ले उद्योग समूहातर्फे 55 स्वयंसेवकांचे पथक कार्यरत असून निपाणी पोलिसांतर्फे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.