अनेकांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगवेगळे असतात. जशी उक्ती असते तशीच कृती होईल, याची शाश्वती नसते. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे आपल्या सुनेचा हुंडय़ासाठी बळी घेण्याचा आरोप असणाऱया राधा नामक महिलेची कहाणी अशीच आहे. वरकरणी ती भगवान श्रीकृष्णाची महान भक्त आहे. अगदी न्यायालयात जातानासुद्धा तिचा ‘लड्डू गोपाल’ तिच्याबरोबर असतो. आपली दैनंदिन कर्मे करण्याचा वेळ सोडला तर सारा दिवस ती कारागृहातही श्रीकृष्णाच्या मूर्तीसमवेतच व्यतीत करते. मात्र, तिचे हे खरे रूप नाही, असे तिचे सहकारी सांगतात. तिच्यावर सुनेची हत्या केल्याचा आरोप आहे.
2016 मध्ये राधाचा पुतण्या सोनू याचा विवाह हरिकिशन नामक व्यक्तीच्या भाचीशी झाला. राधा आपल्या पुतण्याकडेच प्रथमपासून रहात होती. ती कृष्णाची भक्त असली तरी तिची कृती आपल्या सुनेसंबंधात पुतना मावशीसारखी होती. 3 ऑगस्ट 2020 या दिवशी राधाने आपली सून खुशबू हिला जबर मारहाण केली. असा प्रकार नेहमी घडू लागला. 27 नोव्हेंबर 2020 या दिवशी मारहाणीमुळे खुशबूचा मृत्यू झाला. त्यामुळे खुशबूचे मामा हरिकिशन यांनी सोनू आणि राधा यांच्या विरोधात हुंडय़ासाठी सुनेचा बळी घेण्याचा गुन्हा नोंदविला आहे. तेव्हापासून दोघेही कारागृहात बंदिस्त आहेत. कारागृहात या ‘राधे’ची कृष्णभक्ती मात्र अविरत सुरू आहे. यासाठी कारागृहातील इतर कैदी तिची चेष्टाही करतात. तथापि, तिच्यावर याचा काही परिणाम होत नाही. मानवी स्वभाव अजब असतो, हेच खरे.