मान यांना 93 टक्के पाठिंबा ः केजरीवालांनी दिली माहिती
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱयाची औपचारिक घोषणा केली आहे. पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मोहाली येथे भगवंत मान यांच्या नावाची घोषणा केली. आपने मुख्यमंत्रिपदाचा दावेदार निवडण्यासाठी मोबाइल क्रमांक जारी करत जनतेचे मत मागितले होते. 3 दिवसांत 21.59 लाख लोकांनी स्वतःचे मत मांडले, सुमारे 15 लाख लोकांनी भगवंत मान यांना पाठिंबा दर्शविला. मान यांना 93.3 टक्के आणि नवज्योत सिंग सिद्धू यांना 3.6 टक्के मते मिळाल्याचे केजरीवालांनी सांगितले.
पंजाबमधील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे केजरीवालांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर न केल्याने आम आदमी पक्षाला 2017 च्या निवडणुकीत फटका बसला होता. राज्याबाहेरील व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकतो असा प्रचार होऊ लागल्याने पक्षापासून मतदार दुरावले होते.
आपकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केला जाणारा नेताच पंजाबचा भावी मुख्यमंत्री होणार आहे. पंजाबच्या लोकांनी स्वतःचा पुढील मुख्यमंत्री निवडण्यासाठी 21.59 लाख मते दिली. यातील अनेकांनी माझे नाव सुचविले. परंतु मी शर्यतीत नाही. उर्वरित मतांमध्ये 93.3 टक्के लोकांनी भगवंत मान यांचे नाव सुचविले. दुसऱया क्रमांकावर सिद्धू होते, त्यांना 3.6 टक्के मते मिळाल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे.
सिद्धू यांच्यावर टीकास्त्र
आम आदमी पक्षाचा ‘वर’ कोण अशी विचारणा सर्वजण आम्हाला करत होती. आम्ही यासंबंधीची घोषणा केली असल्याचे म्हणत केजरीवाल यांनी नवज्योत सिंह सिद्धू यांना लक्ष्य केले आहे. आपची वरात पूर्ण पंजाबमध्ये फिरत आहे, परंतु वर कोण याचाच पत्ता नसल्याचे सिद्धू यांनी म्हटले होते.
दुप्पट जबाबदारीने काम करणार
पंजाबला केवळ लोकच वाचवू शकतात. मी केवळ याचे माध्यम ठरू शकतो. पंजाबच्या तरुणांच्या हातातील सुई काढून घेत त्यांना टिफिन सोपविणार आहोत. पक्षाने मला अत्यंत मोठी जबाबदारी दिली आहे. लाखो लोकांनी स्वतःचे मत देत माझ्यावर विश्वास दर्शविला असल्याने दुप्पट जबाबदारीने काम करणार असल्याचे भगवंत मान म्हणाले.
गरीबांसाठी काम करणार
जर हिरव्या रंगाचे पेन माझ्या हातात आले तर नेहमीच गरजू आणि गरीबांच्या अधिकाराकरता वापरले जाणार आहे. हे युद्ध जिंकण्यासाठी आम्हाला अथक प्रयत्न करावे लागतील. पंजाब स्वतःच्या पायांवर उभे राहणे चांगल्याप्रकारे जाणतो. पंजाबमधील तरुणाईला विदेशात जाण्यापासून रोखू. सर्वांना त्यांच्या शिक्षणानुसार पंजाबमध्येच नोकरी मिळवून देऊ असे उद्गार मान यांनी काढले आहेत.
प्रचाराचा केंद्रबिंदू केजरीवालच
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा प्रचार अद्याप केजरीवाल यांचा चेहरा समोर करूनच होत आहे. आप केजरीवालांचे नाव पुढे करून एकदा संधी देण्याचे आवाहन करत आहे. आपकडून जनतेचे मत जाणून घेत मुख्यमंत्रिपदाचा दावा केला जात असला तरीही यात कुठलीच स्पर्धा होणार नसल्याची खबरदारी घेण्यात आली होती. पक्षाने नेत्यांची नावे पुढे करून हा उपक्रम राबविलेला नाही. भगवंत मान यांच्यासह विरोधी पक्षनेते हरपाल चीमा आणि कुलतार संधवां हे देखील या शर्यतीत असल्याचे मानले जात होते.