जिल्हय़ातील कोरोनाची आज वर्षपूर्ती
प्रशांत चव्हाण / गुहागर
मध्यरात्रीची वेळ… जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून गुहागर तालुका प्रशासन, पाटपन्हाळे स्थानिक प्रशासन यांना दूरध्वनी आला, शृंगारतळीत कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. तालुका प्रशासनासह पाटपन्हाळे ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांची तारांबळ उडाली. कोरोना रुग्ण आढळलेल्या घराला वेढा, बैठकांमधून उपाययोजनांची खलबते, व्यापाऱयांसह नागरिकांमध्ये दहशत, अशा काहीशा भयाण वातावरणात नेहमी माणसांनी धावणारी, पळणारी शृंगारतळी स्तब्ध झाली. 18 मार्च 2020चा हा दिवस कोरोनाच्या भीतीने आजही शृंगारतळीवासियांच्या मनावर कोरलेलाच आहे.
गेल्यावर्षी 2020मध्ये जानेवारी महिन्यापासूनच कोरोनाचा विळखा बसण्यास सुरुवात झाली होती. याच दरम्यान काही तरुणांचा समुह कतारमधून मायदेशी आला होता. यामध्ये एक तरुण रत्नागिरी जिह्यातील गुहागर तालुक्यातील आपल्या शृंगारतळी गावी आला होता. या तरुणाला त्रास सुरु झाल्याने तो प्रथम शृंगारतळीतील स्थानिक डॉक्टरांकडे गेला. त्याला सुरुवातीला तालुका शासकीय रुग्णालयात व नंतर जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिह्यातील पहिला कोरोना रुग्ण म्हणून त्याची नोंद झाली. येथूनच कोरोनाची दहशत जिह्यात सुरु झाली. जिह्यात नाकाबंदी करण्यात आली. कन्टेनमेंट झोन म्हणून शृंगारतळीला यानिमित्ताने टीळा लागला. तालुका प्रशासनासह पाटपन्हाळे ग्रामपंचायतीची खऱया अर्थाने कसोटी लागली ती आजतागायत.
शृंगारतळी ही गुहागर तालुक्याची सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने येथे नेहमी वर्दळ असते. मात्र कोरोनाचा रुग्ण आढळल्याने शृंगारतळी थबकली. सर्वत्र शुकशुकाट, सर्व व्यवहार बंद, वाहतूक बंद. शृंगारतळीसह गुहागर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून ज्या उपाययोजना राबविण्यात आल्या व त्यासाठी जी अथक मेहनत घेण्यात आली त्याला तोड नाही. लाँकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर येथील व्यवहार सुरळीत असले तरी येथील स्थानिक प्रशासन कोरोनावर उपाययोजना राबवण्यासाठी आजही सतर्क आहे
आठवणी आजही ताज्या…!
कोरोनाच्या आठवणी आजही आमच्या मनात घर करुन आहेत. त्यावेळी उडालेली तारांबळ, नेमक्या उपाययोजना राबविताना झालेली तारेवरची कसरत सरपंच म्हणून कधीच विसरु शकत नाही. मात्र आम्ही न डगमगता या आपत्तीवर विजय मिळविण्यास यशस्वी ठरलो आहोत.
– संजय पवार, सरपंच पाटपन्हाळे
जिल्हय़ातील एका वर्षामधील कोरोनाची आकडेवारी
- एकूण रूग्ण—-10,270
- एकूण मृत्यू–370
- बरे झालेले रूग्ण-9766 बरे होण्याचे प्रमाण—95.09 टक्के