प्रतिनिधी /बेळगाव
येत्या पाच वर्षांत भरतेश एज्युकेशन ट्रस्ट स्वतःचा उपग्रह अवकाशात पाठविणार असल्याचे विनोद दोड्डण्णावर यांनी सांगितले. हलगा येथील भरतेश स्कूलच्या जीवनव्वा दोड्डण्णावर हायस्कूलमध्ये अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अरुण शहापूर, संतमीरा शाळेचे चेअरमन परमेश्वर हेगडे, गटशिक्षणाधिकारी आर. पी. जुट्टण्णावर व शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड उपस्थित होते. याप्रसंगी अरुण शहापूर यांनी अशा विविध उपक्रमांसाठी सर्व त्या सुविधा देण्याची ग्वाही दिली. परमेश्वर हेगडे यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली.
बसवराज नलतवाड यांनी राज्याच्या शैक्षणिक धोरणाबद्दल विचार व्यक्त करून शिक्षण पद्धतीत बदल होईल, अशी आशा व्यक्त केली. संस्थेचे सचिव श्रीपात खेमलापुरे यांनी संस्थेच्या सुवर्ण महोत्सवाची रुपरेषा सांगितली. भरतेशमध्ये ही तिसरी लॅब आहे. याप्रसंगी प्रकाश उपाध्ये, वसंत कोडचवाड, हिराचंद कलमनी, अशोक दनवाडे आदी उपस्थित होते.