कलाकार नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटो, व्हिडिओ किंवा नव्या सिनेमा व मालिकांचे प्रमोशन करत लोकप्रियता मिळवत असतात असं बोलून ट्रोलिंग करणाऱयांना गेल्या काही दिवसात कलाकारांनीही चोख उत्तर दिले आहे. सध्याच्या कोरोना संकटाचा फटका कलाकारांनाही बसला आहे. पण त्यातूनही कलाकार मदतीचा हात पुढे करत आहेत. कलाकार त्यांच्या लाखोच्या घरात असलेल्या फॉलोअर्सपर्यंत मदतीचे आवाहनही करत आहेत. इतकेच नव्हे तर आपल्या खिशातून हातात काहीच काम नसलेल्या पडद्यामागच्या तंत्रज्ञांनाही मदत देत आहेत. पडद्यावर विनोदी अभिनेता अशी ओळख असली तरी प्रत्यक्षात अत्यंत संवेदनशील व्यक्ती असलेल्या अभिनेता भरत जाधव यानेही असाच मदतीसाठी पुढाकार घेतल्याने कोरोना रुग्णांची सोय झाली आहे. भरतने त्याच्या इन्स्टा पेजवर ही गोष्ट शेअर करत तुम्हीही अशाप्रकारे मदत करु शकता असे आवाहन केले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेतही अनेक कलाकारांना कोरोना संसर्गाची लागण झाली होती. शूटिंगच्या निमित्ताने प्रवासात असलेल्या कलाकारांना तर कोरोनामुळे होमक्वारंटाईन व्हावे लागले होतेच पण अनेक कलाकारांच्या कॉलनी, इमारतीतही रुग्ण आढळल्याने कलाकारांनी ही परिस्थिती जवळून पाहिली. अभिनेता भरत जाधव याच्या इमारतीत चार रुग्ण आढळले. त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी भरतने जे पाऊल उचलले त्यासाठी त्याचे कौतुक होत आहे.
भरतने याबाबत पोस्ट लिहिली आहे. तो लिहितोय की, आमच्या इमारतीत चारजणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आहे. त्यांचा फ्लॅट वन बीएचके असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र खोली असली तरी टॉयलेट बाथरुम स्वतंत्र नव्हते. शिवाय घरातील इतर निगेटिव्ह असलेल्या सदस्यांनाही संसर्गाचा धोका होता. उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होण्याची शक्यता नव्हती. जेव्हा ही गोष्ट माझ्या कानावर आली तेव्हा मी आमच्या इमारतीतील जे फ्लॅट रिकामे होते त्यांच्या मालकांशी संपर्क साधून या चार रुग्णांसाठी कोरोना क्वारंटाइन कक्ष म्हणून द्यावेत अशी विनंती केली. सुरुवातीला ते तयार नव्हते पण परिस्थितीचे गांभीर्य पटवून दिल्यानंतर ते तयार झाले. त्यामुळे रुग्णांची सोय इमारतीतच झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांचीही काळजी मिटली. ज्यांनी रिकामे फ्लॅट या कामासाठी दिले त्यांची सहा महिन्यांची मेंटेंनन्स फी माफ केली. अनेकदा इव्हेस्टमेंट म्हणून फ्लॅट घेतले जातात. असे अनेक फ्लॅट सध्या रिकामे आहेत. ते फ्लॅट जर क्वारंटाइन होण्यासाठी खुले केले तर अनेकांची सोय होईल. भरतच्या आवाहनाला अनेकांनी प्रतिसाद दिला आहे. भरत नेहमीच अशाप्रकारे मदत करत असतो. सध्या तो सुखी माणसाचा सदरा ही मालिका करत आहे. पण केवळ मालिकेत सुखी माणसाची व्याख्या सांगण्याबरोबरच भरतची प्रत्यक्ष आयुष्यातील ही सुखी माणसाची कृती कौतुकास्पदच म्हणावी लागेल.