ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
खासदार आणि अभिनेते मनोज तिवारी यांची दिल्ली भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तिवारी यांच्या जागी आदेश गुप्ता यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी यासंदर्भातील आदेश काढला आहे.
तिवारी यांची कोणत्या कारणावरून हकालपट्टी करण्यात आली याबाबतची माहिती अजून समोर आली नाही. दिल्ली निवडणूकीत पराभव झाल्यामुळे तिवारींना नारळ देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तिवारी बाहेरचे असल्यामुळे त्यांना स्थानिक नेत्यांचा यापूर्वीच विरोध होता. आदेश गुप्ता एक वर्ष अगोदर उत्तर एमसीडीचे महापौर होते. त्यांचे व्यापाऱ्यांशी संबंध चांगले असल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी गुप्ता यांना संधी देण्यात आली आहे.
आदर्श गुप्ता मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. कॉलेज संपल्यानंतर ते दिल्लीला आले. ते भाजपा युवा मोर्चातही सक्रिय होते. यासह, त्यांनी कंत्राटदार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 2017 मध्ये गुप्ता यांना एमसीडी निवडणुकीचे तिकीट मिळाले आणि ते विजयी झाले. यानंतर त्यांना उत्तर दिल्लीचा महापौर बनविण्यात आले. आता दिल्ली संघटनेची जबाबदारी गुप्ता यांच्या खांद्यावर ठेवण्यात आली आहे.