प्रतिनिधी/ पणजी
डिचोलीतील जनतेला भाजपमध्ये बदल हवा आणि त्यासाठी आता भाजपने आपल्याला उमेदवारी द्यावी. आपण एवढी वर्षे भाजपसाठी कार्य केलेले आहे. त्यामुळे आपला विचार भाजपने करावा, अशी जोरदार मागणी डिचोली भाजपच्या नेत्या आणि माजी जि. पं. अध्यक्ष शिल्पा नाईक यांनी केली आहे.
विद्यमान आमदार राजेश पाटणेकर यांनी डिचोलीत विकासकामे केलेली आहेत. भाजपने डिचोली मतदारसंघाचा विकास केलेला आहे यात शंकाच नाही. आपण स्वतः 23 वर्षे या मतदारसंघात व संपूर्ण राज्यभरात भाजपची सेवा बजावली. ही सेवा बजावताना आपल्यावर अकारण आरोप झाले. आपल्याला सारा मनस्तापही सोसावा लागला. पती, कन्या तसेच अनेकांनी आपल्या मागे खंबीरपणे उमे राहून आपल्याला धीर दिला व एक महिला नेत्या या नात्याने भाजपने आपला आता जरुर विचार करावा व आपल्याला भाजपची उमेदवारी देऊन संधी द्यावी. आपण पक्षाचे प्रामाणिकपणे कार्य आजवर केलेले आहे आणि आपण पक्षाचे कार्य करीत राहाणार.
डिचोलीच्या जनतेला आता बदल हवा. डिचोलीची जनता भाजपबरोबर आहे आणि भाजपबरोबरच राहाणार. राजेश पाटणेकर हे जेव्हा काँग्रेस पक्षात गेले होते त्यावेळी आपण पक्षासाठी झटून काम केले होते याची आठवण शिल्पा नाईक यांनी करुन दिली. भाजपने पहिला सर्वे केलेला आहे. आता दुसरा सर्वे सुरु केलेला असून त्यानुसार त्यांनी आवश्य निर्णय घ्यावा. आपण कोणताही आग्रह करणार नाही. परंतु आपण आजवर एकनिष्ठेने बजावलेल्या सेवेचा उपयोग व्हावा तसेच आपल्या कार्याचा विचार भाजप करील अशी आपल्याला आशा आहे असेही शिल्पा नाईक म्हणाल्या. आपल्यामुळे कोणीही दुखावला जाऊ नये. उलटपक्षी भाजपसाठी होईल तेवढा त्याग आपण केलेला आहे. पक्षासाठी प्रत्येक निवडणुकीत आपण वावरले. जनतेचा आशीर्वाद आहे. आता पक्षाने आशीर्वाद द्यावा, असेही त्या म्हणाल्या.