नवी दिल्ली येथील संसदीय मंडळाच्या बैठकीत यादी निश्चित
प्रतिनिधी /पणजी
संपूर्ण गोव्याचे लक्ष लागून असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची यादी नवी दिल्ली येथे झालेल्या पक्षाच्या संसदीय मंडळच्या बैठकीत निश्चित झाली असून आज गुरुवारी या यादीवर पुन्हा एकदा काही नावांबाबत फेरविचार होणार असून त्यानंतर दुपारी अधिकृत नावांची घोषणा करण्यात येईल.
भाजपचे गोव्यातील उमेदवार निश्चित करण्यासाठी सायंकळी उशिरा भाजप संसदीय मंडळाच्या झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मेंदी हे दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपलब्ध होते. भापजचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे थोडय़ा उशिराने सहभागी झाले. या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे राष्ट्रीय सचिव बी. एल संतोष, गोव्याचे निवडणूक प्रमुख देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक तसेच सदानंद शेट तानावडे आणि सतिश धेंड तसेच भाजपचे राष्ट्रीय नेते शहनवाझ हुसेन, तसेच भाजपचे गोवा प्रभारी रवी हे देखील उपस्थित होते. गोव्याच्या अगोदर उत्तर प्रदेशमधील द्वितीय टप्प्याचे उमेदवार ठरविण्याकरीता बैठक झाली.
प्राप्त माहितीनुसार, कुंभारजुवेमध्ये विद्यमान आमदार पांडुरंग मडकईकर यांची पत्नी जुने गोवेच्या सरपंच जनिता मडकईकर यांचे नाव कुंभारजुवे मतदारसंघासाठी तर मुरगावसाठी मिलिंद नाईक यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात येणार आहे. या दोघांच्या नावाचा समावेश नव्या यादीमध्ये करण्यात आला आहे. आज दुपारी निवडणूक समितीची पुन्हा एकदा बैठक होत असून यामध्ये या सर्व नावांवर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.