मळणीच्या कामात पुरुषांपेक्षा महिलाच अधिक : सुगी हंगामातील मळणीच्या पद्धतीत पूर्णपणे बदल
प्रतिनिधी /बेळगाव
तालुक्यात सर्वत्र भात कापणी, भात बांधणी आणि मळणीच्या कामांना वेग आला आहे. त्यामुळे सर्वत्र सुगी हंगामाची धांदल सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवारात ताडपत्री, टॅक्टर आणि सुगीत मग्न असलेले शेतकरी असे चित्र दिसत आहे. अलीकडे सुगी हंगामातील मळणीचे स्वरुप बदलले असून मळणी कामात केवळ महिला दिसत आहेत. त्यामुळे मळणीच्या खळय़ात महिलाराज आल्याचे दिसत आहे.
बटाटा, रताळी, भुईमूग आणि सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. भात कापणी आणि मळणी कामाला जोर आला आहे. या मळणीच्या कामात पुरुषांपेक्षा शेतकरी महिलांचीच संख्या अधिक दिसून येत आहे. पूर्वी ग्रामीण भागात मळणी म्हणजे एक उत्सव असायचा. खळय़ात मेठ रोवून बैलांच्या साहाय्याने मळणी केली जात होती. ती पद्धत आता नामशेष झाली आहे. बैलांची जागा ट्रक्टरने तर खळय़ाची जागा ताडपत्रीने घेतली आहे. त्याचबरोबर भात कापणीपासून वारे देण्यापर्यंत यंत्राचा वापर वाढला आहे. काळाच्या ओघात रात्रीच्या मळण्या पूर्णपणे बंद झाल्या आहेत. दिवसभर मळण्या केल्या जात आहेत. या मळणीच्या कामात एक-दोन पुरुष आणि सर्व महिला दिसत आहेत. त्यामुळे मळणीच्या खळय़ावर आता महिलांची मक्तेदारी दिसत आहे.
रात्रीच्या वेळी होणारी मळणी… मेठीभोवती फिरणारे दहा-पंधरा बैल… आणि सोबत रात्रीचे चांदणे हे चित्र आता कालबाहय़ झाले आहे. सुगी हंगामातील मळणीच्या पद्धतीत पूर्णपणे बदल झाला आहे. अलीकडे सर्रास दिवसाच मळण्या केल्या जात आहेत. आणि विशेषतः या मळणीसाठी केवळ महिलांचाच सहभाग दिसून येत आहे.
सुगी हंगाम एकदाच सर्वत्र सुरू झाल्याने मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे काही कुटुंबे एकत्रित येऊन सुगी हंगाम साधत आहेत. काही ठिकाणी परगावांतून मजूर बोलावून कामे उरकून घेतली जात आहेत. मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने काही महिला एकत्रित येऊन भात कापणी आणि मळणी करीत आहेत.
तालुक्मयात बटाटा, रताळी, भुईमूग, ऊस, सोयाबीन आदी पिके घेतली जात असली तरी भात पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. त्यामुळे साहजिकच भाताचे उत्पादनदेखील अधिक आहे. यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर या सुगी हंगामात भात कापणी, भात बांधणी आणि भात मळणीची धांदल सुरू असते. पूर्वी मळणीच्या कामात केवळ पुरुष शेतकरी दिसत होते. भात मळणी आणि वारे देणे ही कामे पुरुषच करीत होते. मात्र, काळाच्या ओघात मळणीचे स्वरुप बदलून आज मळणीच्या कामात केवळ शेतकरी महिला दिसत आहेत. विशेषतः पारंपरिक दोडगा, बासमती याचबरोबर इंद्रायणी, शुभम, सोनम आदी जातीच्या भाताचे उत्पादन घेतले जाते. अलीकडच्या काही वर्षात इंदायणी भाताला समाधानकारक भाव मिळत असल्याने इंद्रायणी भाताच्या उत्पादनात वाढ झाली आहे.
एकत्रित येऊन महिलांकडून मळणीची कामे

पूर्वी रात्रीच्या वेळी मळण्या होत होत्या. त्यामुळे मळणीची कामे पुरुषवर्ग करत होता. आता रात्रीच्या मळण्या बंद झाल्या आहेत. दिवसा मळण्या केल्या जात आहेत. मळण्यांसाठी पुरुष मंडळी मिळत नाहीत. त्यामुळे महिला एकत्रित येऊन मळणीची कामे करीत आहे. दिवसा मळण्या करणे महिलांसाठी सोयीस्कर झाले आहे.
– कलावती हुंदरे (शेतकरी महिला, चलवेनहट्टी)