बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधू, मुष्टियुद्धात एमसी मेरी कोम तर टेटेमध्ये मनिका बात्राचे धमाकेदार विजय
टोकियो / वृत्तसंस्था
बॅडमिंटनमधील विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन पीव्ही सिंधू, बॉक्ंिसगमध्ये सहा वेळची वर्ल्ड चॅम्पियन एमसी मेरी कोम व टेबलटेनिसमध्ये आघाडीची तारका मनिका बात्रा यांनी महिला एकेरीतील आपल्या लढतीत धमोकदार विजय संपादन केला आणि टोकियो ऑलिम्पिकमधील चौथा दिवस अगदी थाटात गाजवला.
26 वर्षीय पीव्ही सिंधूने इस्रायलच्या क्सेनिया पोलिकार्पोव्हावर 21-7, 21-10 अशा सरळ गेम्समध्ये धुव्वा उडवत दिवसाची जोरदार सुरुवात केली. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 7 वाजता सुरु झालेल्या या लढतीत सिंधूने अवघ्या 26 मिनिटातच बाजी मारली. सिंधूची पुढील फेरीत हाँगकाँगच्या 34 व्या मानांकित चेऊंग यी हिच्याविरुद्ध साखळी फेरीतील लढत होईल.
रिओ गेम्समधील रौप्यजेत्या सिंधूने प्रारंभी आक्रमक सुरुवात केली होती. मात्र, नंतर अचानक ती 3-4 अशी मागे पडली. पुढे, पोलिकार्पोव्हाने बऱयाच अनफोर्स एरर्स केल्या आणि याचा लाभ घेत सिंधूला बॅड पॅचवर मात करता आली. पहिल्या ब्रेकदरम्यान तिने 11-5 अशी घेतलेली आघाडी त्यानंतरही कायम राखली. एकवेळ तर तिने सलग 13 गुण जिंकत धडाकाच सुरु केला होता. क्रॉस कोर्ट स्मॅशेस, ड्रॉप्सचे उत्तम फटके लगावत तिने सातत्याने वर्चस्व अबाधित राखले. पोलिकार्पोव्हाचा एक फटका चुकला आणि सिंधूच्या पहिल्या गेममधील विजयावर शिक्कामोर्तब झाले. दुसऱया गेममध्ये देखील सिंधूने जोरदार सुरुवात करत 9-3 अशी आघाडी मिळवली आणि ती कायम देखील राखली. अंतिमतः सिंधूने 21-10 असा विजय संपादन करत आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात केली.
मेरी कोमची प्री-क्वॉर्टर्समध्ये धडक

मुष्टियुद्धातील भारताची स्टार वर्ल्ड चॅम्पियन एमसी मेरी कोमने रविवारी 51 किलोग्रॅम वजनगटातील आपल्या मोहिमेला धडाकेबाज विजयाने प्रारंभ केला. तिने डॉमिनिकन रिपब्लिकच्या मिग्युलिना हर्नांडेझ गार्सियाला 4-1 अशा एकतर्फी फरकाने मात दिली.
2012 ऑलिम्पिक कांस्यजेती 38 वर्षीय मेरी कोम येथे तिच्यापेक्षा 15 वर्षांनी ज्युनियर असलेल्या प्रतिस्पर्धीविरुद्ध लढत होती. प्रारंभापासूनच तिने गार्सियावर दडपण राखण्यात यश मिळवले. ‘मागील काही वर्षे आपल्या सर्वांसाठीच खूप खडतर स्वरुपाची होती. कोरोनाचे संकट आणि सर्व काही बंद असताना प्रत्येकाला अनंत अडचणींचा सामना करावा लागला. ऍथलिट्सना घरातच सराव करावा लागला. पण, मुष्टियुद्धात सरावासाठी पार्टनरची आवश्यकता भासते. त्यामुळे, मुष्टियोद्धय़ांसाठी ते ही कठीण होते’, असे मेरी कोम पहिल्या फेरीतील विजयानंतर म्हणाली.
डॉमिनिकाच्या युवा प्रतिस्पर्धीने येथील लढतीत मेरी कोमवर हल्ले चढवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण, मेरी कोम तिच्यापेक्षा बरीच सरस ठरत गेली. 4 अपत्ये असणारी मेरी कोम आता पुढील फेरीत कोलंबियाच्या इनग्रिट व्हॅलेन्सियाविरुद्ध लढत देईल. व्हॅलेन्सिया ही 2016 रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यजेती असून मेरीने आतापर्यंत झालेल्या दोन्ही लढतीत तिला पराभूत केले आहे. यात 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिप क्वॉर्टरफायनलचाही समावेश आहे.
‘माझ्या हातात सर्व पदके आहेत. 2012 मध्ये ऑलिम्पिक पदक, राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक, सहा वेळची वर्ल्ड चॅम्पियनशिप सुवर्णपदके. ती मोजणे सेपे नाही. पण, जिंकत राहणे, सातत्यपूर्ण प्रदर्शन साकारत राहणे अधिक कठीण आहे. ते सोपे अजिबात नाही. आता ऑलिम्पिक सुवर्ण हेच माझे मुख्य स्वप्न आहे आणि त्यासाठी मी निर्धाराने रिंगणात उतरली आहे’, असेही मेरी याप्रसंगी आवर्जून म्हणाली.
मनिका बात्राची 32 व्या मानांकित पेसोत्स्कावर मात
भारताची स्टार टेबलटेनिसपटू मनिका बात्राने जागतिक क्रमवारीतील 32 व्या मानांकित मार्गारिटा पेसोत्स्काला पराभवाचा जबरदस्त धक्का देत महिला एकेरीत तिसऱया फेरीत धडक मारली. जी. साथियनला मात्र पदार्पणाच्या ऑलिम्पिकमध्ये पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला.
62 व्या मानांकित मनिकाने पहिले दोन गेम गमावल्यानंतरही पुढील 5 पैकी 4 गेम्स जिंकत रोमांचक विजय प्राप्त केला. मनिकाला पहिले दोन गेम 4-11, 4-11 असे गमवावे लागले. त्यानंतर मात्र, 11-7, 12-10, 8-11, 11-5, 11-7 अशा फरकाने तिने विजयश्री खेचून आणली. आज मनिकाची राऊंड ऑफ 16 साठी ऑस्ट्रियाच्या सोफिया पोल्कानोव्हाविरुद्ध लढत होईल. मनिकाने आणखी एक धमाकेदार विजय संपादन केला तर तो तिच्यासाठी मोठा पराक्रम ठरेल. बात्राची ही दुसरी ऑलिम्पिक आहे.
बॉक्स (फोटो-25 एसपीओ 11-सानिया मिर्झा-अंकिता रैना)
सानिया मिर्झा-अंकिता रैनाचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात
भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा व पदार्पणवीर अंकिता रैना यांचे टोकियो ऑलिम्पिक महिला दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले. या जोडीने युक्रेनच्या नॅदिला व ल्यूडमिला किशेनोकविरुद्ध वर्चस्व गाजवले असले तरी त्यांना अंतिमतः पराभवाला सामोरे जावे लागले.
सानिया व अंकिता यांनी पहिला सेट एकतर्फी जिंकला. पण, नंतर युक्रेनची जोडी त्यांच्यापेक्षा सरस कामगिरी साकारण्यात यशस्वी ठरली. या जोडीने ऍरिएके टेनिस कोर्टवरील लढतीत 0-6, 7-6 (7-0), 10-8 अशा फरकाने विजय संपादन केला. सानिया येथे दुसऱया सेटमध्ये 5-3 अशी स्थिती असताना मॅचसाठी सर्व्हिस करत होती. पण, सर्व्ह ड्रॉप केल्यानंतर ही संधी निष्फळ गेली.
सुपर टायब्रेकमध्ये सानिया-रैना एकवेळ 1-8 असे पिछाडीवर होते. नंतर त्यांनी सलग 7 पॉईंट जिंकत 8-8 अशी बरोबरी प्राप्त केली. पण, नंतर सलग 2 गुण गमावल्याने त्यांची पिछेहाट झाली.
बॉक्स (25 एसपीओ 06-जी.साथियान)
टेटेपटू साथियानचीही स्पर्धेतून एक्झिट
भारतीय टेबलटेनिसपटू जी. साथियानला पुरुष एकेरीत निचांकी मानांकित सिऊ हँग लॅमकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर साथियानचे यंदाच्या ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले.
38 रँकिंग व 26 वा सिडेड साथियानने एकवेळ 3-1 असे लीड घेतले होते. मात्र, नंतर सलग 4 गेम गमावल्यानंतर त्याला पराभव पत्करणे भाग होते. पहिल्या गेममध्ये उभयतात बरीच चुरस रंगली. मात्र, हाँगकाँग प्रतिस्पर्धी सिऊने यात बाजी मारली. निर्णायक गेममध्ये लॅमने 5-2 अशी आघाडी घेतली. साथियनने ती 9-6 अशी कमीही केली. मात्र, फोरहँडचा फटका चुकल्यानंतर लॅमच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.
बॉक्स (25 एसपीओ 07-प्रणती नायक)
भारताची एकमेव जिम्नॅस्ट प्रणती नायकही बाहेर
यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली भारताची एकमेव जिम्नॅस्ट प्रणती नायकचे आव्हान देखील संपुष्टात आले आहे. प्रणतीला आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स इव्हेंटमध्ये फायनलसाठी पात्रता मिळवता आली नाही.
पश्चिम बंगालच्या 26 वर्षीय प्रणतीने चार कॅटेगरीत (फ्लोअर एक्सरसाईज, व्हॉल्ट, अनईव्हन बार्स, बॅलन्स बीम) 42.565 गुण मिळवले होते. दुसऱया सुपरडीव्हिजननंतर ती 29 व्या स्थानी राहिली. या इव्हेंटमध्ये एकूण 5 सबडीव्हिजन असून त्यातून चारही कॅटेगरीत अव्वल कामगिरी करणारे 24 जिम्नॅस्ट ऑल-अराऊंड फायनलसाठी पात्र ठरतात, अशी रचना आहे. ऑल अराऊंड फायनल दि. 29 जुलै रोजी होईल.
प्रत्येक इव्हेंटमधील टॉपचे 8 जिम्नॅस्ट ज्या-त्या इव्हेंटममधील फायनलसाठी पात्र ठरतील. या फायनलच्या लढती दि. 1 ते 3 ऑगस्ट या कालावधीत होणार आहेत. प्रणती नायक मात्र सर्व इव्हेंटमध्ये उत्तरार्धात राहिली.
9 वी सिनियर आशियाई चॅम्पियनशिप रद्द झाल्यानंतर कॉन्टिनेन्टल कोटा मिळाल्याने ऑलिम्पिक पात्रता संपादन करणाऱया प्रणती नायकला यंदा ऑलिम्पिक तयारीसाठी खूपच कमी वेळ मिळाला. तिने यापूर्वी आशियाई आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्य जिंकले होते.
बॉक्स (25 एसपीओ 14- अर्जुन लाल व अरविंद सिंग)
अर्जुन-अरविंद उपांत्य फेरीसाठी पात्र
भारतीय रोव्हर्स अर्जुन लाल जाट व अरविंद सिंग यांनी पुरुषांच्या लाईटवेट डबल स्कल्स रिपचेजच्या उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली. या भारतीय जोडीने 6ः51.36 वेळ नोंदवत तिसरे स्थान मिळवले. पोलंडच्या जेर्झी कोवाल्स्की व आर्थर मिकोलाझस्की यांनी 6ः43.44 वेळेसह अव्वलस्थान प्राप्त केले. स्पेनच्या कॅएतेनो होर्ता पोम्बो व मॅनेल बॅलास्तेगुई यांनी 6ः45.71 वेळ नोंदवली. या इव्हेंटमधील उपांत्य फेरी दि. 27 रोजी होणार आहे.