ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय रेल्वेने स्वतःचे रेकॉर्ड मोडत 1 जुलै रोजी नवा इतिहास रचला आहे. 1 जुलै रोजी भारतातील सर्व रेल्वे 100 टक्के वेळापत्रकानुसार धावल्या. सर्व ट्रेन नियोजित वेळेवर सुटून नियोजित गंतव्य स्थानावर पोहोचल्या. याआधी 23 जून 2020 ला एक ट्रेन विलंबाने पोहोचल्याने वेळापत्रकाच्या काटेकोर अंमलबजावणीचा विक्रम 99.54 टक्के नोंदवण्यात आला होता. हा विक्रम मोडून भारतीय रेल्वे काल नवा इतिहास रचला आहे.

मागील महिन्यात 230 विशेष रेल्वे गाड्या 100 टक्के पूर्वनियोजित वेळेवर संचालित करण्याचे निर्देश रेल्वेकडून प्रत्येक झोनला देण्यात आले होते. देशात दररोज सरासरी 13 हजारांहून अधिक रेल्वे धावतात. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष वी के यादव यांनी सर्व महाव्यवस्थापक आणि रेल्वे व्यवस्थापकांना 30 राजधानी ट्रेन तसेच 200 प्रवासी ट्रेनला कुठलाही विलंब होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश दिले होते.
पुढे ते म्हणाले, सध्या लॉक डाऊनमुळे रेल्वेच्या क्षमतेपेक्षा अनेक कमी पटीने रेल्वे चालवल्या जात आहेत. त्यामुळे वेळापत्रकाचे 100 टक्के पालन होणे गरजेचे आहे. प्रवासी ट्रेन संचलित करण्यासाठी खाजगी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आल्यानंतर एका दिवसातच रेल्वेने हा विक्रम नोंदवला आहे.