प्रतिनिधी / बेळगाव
भारतीय लष्कर केवळ देशाच्या सीमेचीच नाही तर अंतर्गत सुरक्षेचीही काळजी घेते. सतत नवनवीन आक्हाने स्वीकारुन कसोटीला खरे उतरणाऱया भारतीय लष्कराचा आम्हाला अभिमान आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला कणखर करत भारताला बलशाली (‘मेक इंडिया स्ट्रॉंगर बाय मेकींग एव्हरी इंडियन स्ट्रॉंगर’) करण्यासाठी आपण कटिबध्द राहूया, असे आवाहन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले.
भारताने पाकिस्तानवर 1971 च्या युध्दात विजय मिळवून 50 वर्षे वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त ‘कर्तव्य, मान, साहस’ असे ब्रीद मिरवणाऱया मराठा लाईट इन्फंट्री येथे गुरूवारी ‘स्वर्णिंम विजय दिवस’ साजरा करण्यात आला. त्यावेळी युध्द स्मारकावर सर्व शहीदांना श्रध्दांजली अर्पण केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी लष्करातील सेवेसाठी दिल्या जाणाऱया सन्मान पुरस्कारांच्या निधीमध्ये भरघोस वाढ केल्याचे जाहीर केले.
ते म्हणाले, आपण पाकिस्तानवर विजय मिळविला आणि संपूर्ण जग आपल्याकडे ‘आर्मी पावर’ म्हणून पाहू लागले. या युध्दामध्ये मराठा लाईट इन्फंट्रीने महत्वपूर्ण भूमीका बजावली. आज परिस्थिती बदली असून तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे. भारत तंत्रज्ञानामध्ये आणि युध्द कौशल्यामध्ये सक्षम झालेला आहे. आपण आर्थिक, नैसर्गिक आणि सैन्य या तीनही बाबतीत सक्षम आहोत.
पाकिस्तानावर मिळविलेला विजय आजही प्रेरणा देणारा आहे. एक सुदृढ, सक्षम समाज, सक्षम सैन्यदलाला नेहमीच पाठिंबा देतो. आज सैन्यदल प्रमुख बिपीन रावत यांचे स्मरण करणे हे आमचे कर्तव्य आहे. दूरदृष्टी असलेले कणखर नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. त्यांच्यासह अपघातात मृत्यू पावलेल्या सर्व अधिकाऱयांना तसेच सर्व शहीदांना मी श्रध्दांजली अर्पण करतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांसह मेजर जनरल जे. व्ही. प्रसाद, राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण सुद, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, राज्याचे मुख्य सचिव पी. रवीकुमार यांनी युध्द स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन शहीदांना श्रध्दांजली अर्पण केली. इन्फंट्रीचे ब्रिगेडीअर रोहित चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपल्या भाषणात लष्करी सेवेमध्ये बजावलेल्या उत्तम कामगिरीसाठी दिल्या जाणाऱया सन्मान पुरस्काराच्या निधीमध्ये भरघोस वाढ केल्याचे जाहीर केले. हा निधी पुढील प्रमाणे….
सन्मान पुरस्कार | पूर्वीचा निधी | वाढीव निधी |
परमवीर चक्र | 25 लाख | 1.5 कोटी |
महावीर चक्र | 12 लाख | 1 कोटी |
अशोक चक्र | 25 लाख | 1.5 कोटी |
किर्ती चक्र | 12 लाख | 1 कोटी |
वीरचक्र | 8 लाख | 50 लाख |
शौर्य चक्र | 8 लाख | 50 लाख |
सेना मेडल | 2 लाख | 15 लाख |
मेन्शन इन डिस्पॅच | 2 लाख | 15 लाख |