तरुण भारत संवाद प्रतिनिधी / बार्शी
महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा भिडे वाडा पुणे या ठिकाणी चालू केली होती. हा भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात यावे आणि भिडे वाड्याचा संपूर्ण विकास व्हावा अशा मागणीचे निवेदन प्रांत अधिकारी हेमंत निकम व तहसीलदार जमदाडे यांना अखिल माळी युवा मंचच्या वतीने देण्यात आले. यावेळी माऊली नाळे, नागेश म्हेत्रे, श्रीहरी यादव, नितीन भोसले, दिनेश नाळे, धैर्यशील पाटील, दादा शिंदे, गणेश घोलप आदी उपस्थित होते.
संपूर्ण आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा भिडेवाडा या ठिकाणी पुणे या ठिकाणी फुले दाम्पत्याने चालू केली होती. १ जानेवारी १८४८ साली सुरू झालेल्या या शाळेने ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवली आहे आणि महिलांना सन्मानपूर्वक जगण्याचे एक साधन निर्माण केले आहे. अशा महत्वपूर्ण भिडे वाड्याची आज दुरावस्था झाली आहे. ही दुरावस्था तमाम फुले प्रेमी अनुयायांसाठी वेदनादायक ठरत आहे. तेव्हा शासनाने तात्काळ भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावा आणि या वाड्याचा पूर्णपणे विकास करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. जर शासनाने या वेळी योग्य पाऊल उचलले नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात दिला गेला आहे.