पर्यटकांना राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात अस्वल, तरसही लवकरच पाहता येणार

प्रतिनिधी /बेळगाव
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात तीन सांबर दाखल झाले आहेत. त्यामध्ये एक नर व दोन मादींचा समावेश आहे. याबरोबरच येत्या दोन-चार दिवसांत अस्वल आणि तरसदेखील दाखल होणार आहेत. त्यामुळे दाखल झालेल्या वन्यप्राण्यांना पाहण्यासाठी पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दाखल झालेले सांबर निवाराशेडमध्ये ठेवून दिवसभर पर्यटकांसाठी खुले करण्यात येत आहेत.
भुतरामहट्टी येथील मिनी प्राणी संग्रहालयाचा म्हैसूर येथील प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर विकास साधला जात आहे. तब्बल 50 कोटीच्या निधीतून विविध सुविधा पुरविल्या जात आहेत. गतवषी टप्प्याटप्प्याने तीन सिंह, दोन वाघ, दोन बिबटे आणि दोन कोल्हे आणण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. आता त्यात तीन सांबरांची भर पडली आहे. शिवाय येत्या काही दिवसांत अस्वल आणि तरसदेखील दाखल होणार आहेत. त्यामुळे वन्यप्रेमींबरोबर पर्यटकांना एकाच ठिकाणी सर्व वन्यप्राणी पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. प्राणी संग्रहालयात वन्यप्राण्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मोठय़ा वन्यप्राण्यांसाठी होल्डींग रूम, आवास कोठडी तर लहान वन्यप्राण्यांसाठी निवाराशेडची व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या काळात अस्वल, तरस, हरिण, माकड, मगर, गवीरेडे व इतर प्राणी-पक्षीदेखील दाखल होणार आहेत.
संग्रहालयात सांबरांना ठेवण्यासाठी निवाराशेडचे काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी लवकरच हरिण पर्यटकांसाठी खुल्या ठेवल्या जाणार आहेत. सध्या येथील स्थानिक वातावरणाला जुळवून घेतात की नाही, याची चाचणी करण्यासाठी कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेत पर्यटकांसाठी येत्या दोन दिवसांत हरिण खुल्या केल्या जाणार आहेत, अशी माहिती भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयातून उपलब्ध झाली आहे.