ट्रॅक्टरची मोटार सायकलला धकड
प्रतिनिधी / बेळगाव
भरधाव ट्रॅक्टरची मोटार सायकलला धडक बसून पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील भुतरामहट्टी जवळ मंगळवारी झालेल्या वाहन अपघातात बेनकोळी येथील एका तरुणाचा मृत्यू झाला तर त्याची आई जखमी झाली आहे. काकती पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.
अर्जुन यल्लाप्पा गस्ती (वय 24, रा. बेनकोळी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. त्याची आई होळेव्वा गस्ती (वय 50) ही जखमी झाली असून तिच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात आले. अर्जुन हा हत्तरगी जवळील एका खासगी कंपनीत काम करत होता.
मंगळवारी सकाळी केए 23 ईएन 4892 क्रमांकाच्या मोटार सायकलवरुन अर्जुन व त्याची आई भुतरामहट्टीहून बेळगावकडे येत होते. त्यावेळी भरधाव ट्रक्टरची मोटार सायकलला धडक बसून अर्जुन गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी इस्पितळात हलविण्यात आले. सायंकाळी उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर पुढील तपास करीत आहेत.