मागील आठवडय़ापासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असले अपेक्षित महसुलापासून दूर
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे बंद असलेले भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालय मागील आठवडय़ापासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असले तरी पर्यटकांनी पाठ फिरविल्याने महसूलात म्हणावी तशी वाढ झाली नसल्याची माहिती प्राणीसंग्रहालयाकडून मिळाली आहे.
शहरापासून जवळ असलेल्या भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयात तीन सिंह, दोन वाघ, दोन बिबटे, तीन कोल्हे यासह हरीण, मगर विविध पक्षी दाखल झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्राणीसंग्रहालय साधारण दीड महिन्यासाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे दैनंदिन महसूलही पूर्णपणे थांबला होता. दरम्यान प्राण्यांच्या देखभालीचा प्रश्न निर्माण झाला होता. आता कोरोना नियम शिथिल झाल्याने प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी पूर्ववत खुले करण्यात आले आहे. मात्र मागील आठवडय़ाभरात पर्यटकांचा प्रतिसाद थंडावलेलाच पहायला मिळत आहे.
उन्हाळी हंगामातच संग्रहालय बंद असल्याने परिणाम
कोरोनाची दुसरी लाट येण्याआधी प्राणीसंग्रहालयाला पर्यटकांच्या माध्यमातून दररोज 20 ते 25 हजारांचे उत्पन्न मिळत होते. मात्र आता हा महसूल केवळ 9 ते 10 हजार रुपयांपर्यंत घसरला आहे. प्राणी संग्रहालयात विविध प्राणी दाखल झाल्याने पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. मात्र यंदा उन्हाळय़ाच्या हंगामातच संग्रहालय पर्यटकांसाठी बंद झाल्याने संग्रहालयाला अधिक उत्पन्नापासून दूर रहावे लागले आहे.
प्राण्यांना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी
प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या आदेशानुसार प्राण्यांना कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. प्राण्यांची देखभाल करणाऱयांची वेळोवेळी तपासणी केली जात आहे. शिवाय कर्मचाऱयांना वेटमॅटवरून प्राण्यांच्याजवळ आहार पाणी पुरवठा करण्यासाठी सोडले जात आहे. शिवाय दररोज संग्रहालयाचे सॅनिटायझेशन केले जात आहे. संग्रहालयात दाखल झालेल्या प्राण्यांच्या देखभालीसाठी दत्तक योजना राबविली जात आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी संग्रहालयाचा दैनंदिन खर्च मोठा आहे. हा खर्च पर्यटकांच्या माध्यमातून मिळणाऱया शुल्कातून भागविला जातो. मात्र सध्या पर्यटकांची संख्या कमी असल्याने दैनंदिन खर्चाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या प्राणी संग्रहालय सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत पर्यटकांसाठी खुले करण्यात येत आहे. शिवाय पर्यटकांना मास्क व कोरोनासंदर्भातील इतर नियमांचे पालन करूनच प्रवेश दिला जात आहे. प्रौढ व्यक्तींसाठी 40 रुपये तर 5 वर्षाखालील बालकांसाठी 20 रुपये शुल्क आकारण्यात येत आहे.
पर्यटकांचा अल्प प्रतिसाद
कोरोना काळात पर्यटकांवर निर्बंध आल्याने महसूल थांबला होता. त्यामुळे प्राण्यांचा दैनंदिन खर्च भागविणे अडचणीचे बनले होते. सध्या संग्रहालय खुले करण्यात आले असले तरी पर्यटकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे महसुलात वाढ झाली नाही.
– राकेश अर्जुनवाड (आरएफओ भुतरामहट्टी)