22 लाखांच्या थकबाकीमुळे पालिकेची कारवाई
प्रतिनिधी/ कराड
येथील नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईतील 17 गाळे करवसुली विभागाने बुधवारी पोलीस बंदोबस्तात सील केले. या गाळेधारकांकडून सुमारे 22 लाख रूपये थकबाकी आहे.
नवीन भाजी मंडईतील 18 गाळेधारकांची उर्वरित डिपॉझीट रक्कम सुमारे 22 लाख 1 हजार 700 रूपये इतकी येणेबाकी होती. याबाबत नगरपरिषदेने वारंवार सूचना देऊनही गाळेधारक शिल्लक डिपॉझीटची रक्कम भरत नव्हते. त्यामुळे त्यांना 22 जून 2020 रोजी नोटीस देऊन उर्वरित डिपॉझीट रक्कम भरण्याबाबत कळविण्यात आलेले होते. सदर नोटीसला अनुसरुन 3 गाळेधारकांनी शिल्लक डिपॉझीटपैकी 2 लाख 36 हजार रूपये भरले होते. त्यामुळे उर्वरित थकीत डिपॉझीट रक्कम 19 लाख 65 हजार 700 येणेबाकी राहिल्याने नगरपरिषदेने सदर 18 गाळयांवर जप्तीची कारवाई सुरु केली. कारवाई सुरु असताना एका गाळेधारकाने 75 हजार रूपये भरले. उर्वरित 17 गाळेधारकांचे गाळे नगरपरिषदेने आज सील केले.
मुख्याधिकारी रमाकांत डाके यांचे मार्गदर्शनाखाली कर वसुली विभाग प्रमुख उमेश महादर, अल्ताफ मांगलेकर, पांडुरंग सपकाळ, गणेश दुबळे, विनोद भोसले, राजेश जाधव आदींनी केली.